आता परीक्षा कुलगुरूंचीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 04:56 AM2018-05-01T04:56:38+5:302018-05-01T04:56:38+5:30
अखेर मुंबई विद्यापीठाला नवे कुलगुरू मिळाले आहेत. रुईया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून निवड झाली आहे.
मुंबई : अखेर मुंबई विद्यापीठाला नवे कुलगुरू मिळाले आहेत. रुईया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून निवड झाली आहे. राज्यपालांनी नुकतेच राजभवनात डॉ. सुहास पेडणेकर यांना नियुक्तीपत्र सोपवले. ६-७ महिन्यांच्या कालावधीनंतर अखेर विद्यापीठाला हक्काचा वाली मिळाल्याने आता समस्त विद्यार्थीवर्गाच्या कुलगुरूंकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे भविष्यात तरी आता विद्यापीठाची जुनी ओळख पुसून नवी वलयांकित प्रतिमा तयार होईल या आशेने विद्यार्थीवर्गाकडूनही कुलगुरूंच्या वाटचालीला खूप शुभेच्छा आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. त्यामुळे आता विद्यापीठात नव्या चर्चेला उधाण आले असून कुलगुरूंसमोरील आव्हानांचीच आता परीक्षा आहे. गेले काही दिवस या परीक्षा व्यवस्थापनातील, खरे तर व्यवस्थापनशून्य अवस्थेच्या विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचे दर्शन झाले. त्यामुळे या काळात मुंबई विद्यापीठाचे प्रचंड नुकसान झाले.
बारावी किंवा पदवीचे शेवटचे वर्ष असो, अशा महत्त्वाच्या वर्षांमध्ये आपल्या संस्थेतील विद्यार्थी सर्वोच्च यश मिळवून आपल्या संस्थेचे नाव उज्ज्वल करतील, अशी अशा बाळगणारे संस्थाचालक किंवा पैशाच्या लोभापायी प्रामाणिकपणा विकणारे शिक्षणक्षेत्रात काम करणारे लोक या पेपरफुटीमध्ये आघाडीवर असतात. अशा वाईट वृत्तींना साथ मिळते ती नापास होण्याची भीती बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांची. हे प्रकार सध्या नव्याने होत आहेत असे नाही. अगदी पूर्वापार पेपरफुटीचे प्रकार सुरू आहेत. सुरुवातीला छपाई केंद्रांतून पेपरफुटी होत असे. आता ती सोशल मीडियाच्या माध्यमातून, विशेषत: व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून केली जाते. यामुळे प्रशासनासमोर या नवीन प्रकाराला रोखण्याचे नवे आव्हान उभे ठाकले आहे. याशिवाय, आॅनलाइन मूल्यांकन, सिनेट निवडणुका, जीएस निवडणुका, निकालातील घोळ व विलंब, पुनर्मूल्यांकनाचा मुद्दा या समस्यांवर तोडगा निघणे गरजेचे आहे.
एकूणच मुंबई युनिव्हर्सिटीचा जो दर्जा ढासळत चाललाय त्यावर नियंत्रण ठेवणे खरेच खूप महत्त्वाचे वाटते. कारण युनिव्हर्सिटी मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी व्यवस्थित पेलू शकत नाहीये तर त्यांचा सर्वांगीण विकास खूपच दूर राहिला. त्यामुळे युनिव्हर्सिटीच्या एकूणच यंत्रणेवर कुलगुरूंनी प्रत्यक्षपणे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. निकालातला सावळा गोंधळ हा यंत्रणेतल्याच लोकांकडून केला गेलेला ‘एक प्रयोग’ वाटतो. त्याबद्दल आता बोलणे उपयोगाचे नाही. परंतु यापुढे निकाल लावताना व्यवस्थित नियोजन केले जावे ही एक माफक अपेक्षा आहे. नियोजन केल्यावर त्याची अंमलबजावणीही व्यवस्थितरीत्या व्हावी. नवी यंत्रणा आणणे स्वागतार्हच, परंतु त्याचा फटका जर विद्यार्थ्यांनाच बसत असेल तर त्या यंत्रणेचा काय उपयोग? नवे कुलगुरू मुंबई युनिव्हर्सिटीत नक्कीच चांगले बदल आणतील अशी अपेक्षा आहे. - अंतरा शिंदे, रुईया महाविद्यालय
निकालाच्या बाबतीत माझा स्वत:चाही वाईट अनुभव आहे. पेपरमध्ये पास असते, परंतु पेपर पुनर्मूल्यांकनासाठी टाकल्यावर १२ ते १५ मार्क वाढतात. तरीदेखील नापास केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पेपर हे व्यवस्थित तपासले जावेत. परीक्षा संपल्यावर ४५ दिवसांत निकाल लागणे अपेक्षित आहे. तो वेळेत लागावा आणि योग्य लावावा. आता सहाव्या सेमिस्टरची परीक्षा तोंडावर आलेली असून अजूनही पाचव्या सेमिस्टरचे निकाल लागलेले नाहीत. याचा त्रास हा विद्यार्थ्यांना भोगावा लागत आहे. निकालाच्या गोंधळात मलाही नापास करण्यात आले होते. काही विद्यार्थी अभ्यास न करता पास होत आहेत, तर काही विद्यार्थी अभ्यास करूनही नापास होत आहेत. कुलगुरूंनी निकालाच्या बाबतीत ठोस निर्णय घ्यावेत.
- वीणा कुलकर्णी,
न्यू लॉ कॉलेज, रुपारेल महाविद्यालय
विद्यापीठाकडून आता एकच अपेक्षा आहे की, निकाल व परीक्षा लांबणीवर नेऊ नयेत. काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा या मे महिन्यापर्यंत लांबविल्या आहेत. असे होऊ नये. परीक्षा वेळेत घेतल्या पाहिजेत. त्याचा निकाल एक ते दीड महिन्यात लागला पाहिजे. पेपर तपासणीसाठी तंत्रज्ञान अवगत असलेल्या शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी.
- अंजली हेगडे, दालमिया महाविद्यालय
कुलगुरूंनी मुलांच्या गरजा आणि वाढती स्पर्धा लक्षात घेऊन शिक्षणाच्या तरतुदी, सुविधा उपलब्ध कराव्यात. निकालाच्या गोंधळात कित्येक मुलांचे वर्ष वाया गेले. खूप मुलांचे पेपर गहाळ झाले, हे सर्व विद्यापीठाच्या निष्काळजीपणामुळेच झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षा द्यावी लागली, जे अत्यंत गैरसोयीचे आहे.
- ओमकार घळसासी, विल्सन महाविद्यालय