कचरा फेकणाऱ्यांवर आता पोलिसांची नजर, स्वच्छतेसाठी उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 02:45 AM2019-06-12T02:45:01+5:302019-06-12T02:45:40+5:30
महापालिकेच्या पथकात समावेश : स्वच्छतेसाठी उपाययोजना
मुंबई : नाल्यांमध्ये कचरा टाकणाºया स्थानिक रहिवाशांचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दोन आठवड्यांपूर्वी दिला होता. मात्र सार्वजनिक परिसर अस्वच्छ करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पालिका आता पोलिसांची मदत घेणार आहे. या विशेष पथकामध्ये पोलिस कर्मचारी/अधिकाºयाचांही समावेश असणार आहे. हे गस्ती पथक नाल्यालगतच्या परिसराबरोबरच रेल्वे स्टेशनसारखे गर्दीचे ठिकाण, रेल्वे ट्रॅकलगतचा परिसर, झोपडपट्टी अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाºयांवर कारवाई करणार आहे.
मुंबईची तुंबापुरी होऊ नये, यासाठी महापालिकेने नाल्यांच्या सफाईचे काम वर्षभर करण्याचा निर्णय घेतला. परंतु, स्थानिक रहिवाशी नाल्यांमध्ये कचरा टाकत असल्याचे आढळून आले आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी पालिका प्रशासनाने काही वर्षांपूर्वी कारवाईचा निर्णय घेतला. मात्र ही मोहीम यशस्वी ठरली नाही, त्यामुळे पोलिसांमार्फतच कारवाई करण्याचा निर्णय आयुक्त प्रवीण परदेशी यांनी घेतला आहे. त्यानुसार २४ गस्ती पथके तयार करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या प्रत्येक पथकात मुंबई पोलिसांच्या प्रतिनिधींचाही समावेश असणार आहे.
या पथकांद्वारे नाल्यांचा परिसर, रेल्वे स्टेशनलगतची गर्दीची ठिकाणे, रेल्वे ट्रॅकलगतचा परिसर, झोपडपट्टी अशा सार्वजनिक परिसरावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणी कचरा करणारे आढळून आल्यास त्यांच्यावर ‘मुंबई पोलीस अधिनियम १९५१’नुसार तत्काळ कारवाई केली जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापन खात्यातील विशेष कार्याधिकारी सुभाष दळवी यांच्यावर समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर मुंबई पोलिसांच्या वतीने ‘समन्वय अधिकारी’ म्हणून पोलीस दलाचे उपायुक्त (आॅपरेशन) यांची नेमणूक करण्यात आली आहे.
येथे कचरा टाकल्यास सावधान...
या पथकांद्वारे नाल्यांच्या लगतचा परिसर, रेल्वे स्टेशनलगतची गर्दीचे ठिकाण, रेल्वे ट्रॅकलगतचा परिसर, झोपडपट्टी परिसर इत्यादी सार्वजनिक ठिकाणी नियमितपणे गस्त घालण्यात येणार आहे. यादरम्यान नाल्यांमध्ये कचरा टाकणाºया व्यक्ती, सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाºया व्यक्ती इत्यादींवर ‘मुंबई पोलीस अधिनियम १९५१’ अंतर्गत कलम ११५ व ११६नुसार तत्काळ कारवाई केली जाणार आहे.
यांचा असेल पथकामध्ये समावेश
पालिकेच्या २४ गस्ती पथकांमध्ये प्रामुख्याने घनकचरा व्यवस्थापन खात्यातील कनिष्ठ अवेक्षक, मुकादम, अनुज्ञापन निरीक्षक, अतिक्रमण निरीक्षक, साहाय्यक अभियंता परिरक्षण यांचे प्रतिनिधी, वसाहत अधिकारी, दुकाने व आस्थापना निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक इत्यादींचा समावेश आहे. तसेच विभागस्तरीय पथकांमध्ये मुंबई पोलिसांच्या प्रतिनिधींचादेखील समावेश असणार आहे.