Join us  

आता एसीच्या थंड हवेतून कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती होणार कमी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 4:07 AM

बंद खाेलीत एसीच्या थंड हवेतून कोरोनाचा संसर्ग पसरणार नाही ना, अशी भीती अनेकांना आहे.

- सीमा महांगडे

मुंबई : कोरोनाचा संसर्ग बंद खोलीत अधिक तीव्र होण्याची शक्यता असते तर मोकळ्या जागेत, हवेत तो शिथिल होत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. मात्र, उन्हाळ्यात अंगाची लाही कमी करण्यासाठी खाेली बंद करून एसी लावला जाताे. त्यामुळे बंद खाेलीत एसीच्या थंड हवेतून कोरोनाचा संसर्ग पसरणार नाही ना, अशी भीती अनेकांना आहे. अशा संकटसमयी वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद म्हणजे सीएसआयआर मदतीला धावून आली असून, तेथील संशोधकांनी संसर्ग पसरू नये यासाठी बंद खोलीतील एसीत हवेवर प्रक्रिया करणारे तंत्रज्ञान शोधले आहे. लवकरच ते बाजारात उपलब्ध होणार असल्याची माहिती सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी दिली.

सीएसआयआरच्या रूरकी आणि चंदीगड येथील प्रयोगशाळांमध्ये या उपकरणांचे संशोधन करण्यात आले. सीएसआयआरच्या चंदीगड येथील इन्स्टिट्यूट ऑफ मायक्रोबिअल टेक्नॉलॉजी यांनी प्रक्रिया केलेल्या हवेत कोरोना विषाणू नसल्याचे सिद्ध केल्याची माहिती डॉ. शेखर मांडे यांनी दिली. आता लवकरात लवकर उद्योजकांनी ही उपकरणे बाजारात आणून लोकांपर्यंत पोहोचवावीत जेणेकरून बंद खोल्यांमध्ये बसणाऱ्या लोकांना कोरोना संसर्गाचा धोका कमी होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून यावर हैदराबाद आणि चंदीगड येथील प्रयोगशाळेत काम सुरू असून, आता त्यांना यश मिळाले आहे. बंद खोलीत, मोकळ्या हवेत विषाणू आहेत का, त्यांचे प्रमाण किती आहे, विषाणू सक्रिय आहेत की निष्क्रिय, या सर्वांचे निदान ही उपकरणे करू शकणार असल्याचे डॉ. मांडे यांनी सांगितले. या संशोधनाचे उत्पादनात रूपांतरण करण्यासाठी कंपन्या पुढे आल्या की ते लगेचच बाजारात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

* गाडी, थिएटर्स, शाळांमध्येही होऊ शकणार वापर

हवेतील कोरोना विषाणूवर प्रक्रिया करणारे हे सीएसआयआरचे संशोधन सर्व ठिकाणी म्हणजेच अगदी शाळा, थिएटर, रेल्वे, कॉर्पोरेट ऑफिससह घरातील एसी आणि गाडीतही उपयुक्त ठरणार असल्याचे डॉ. मांडे यांनी सांगितले.