बकाल वस्त्या सुधारण्यावर आता लक्ष द्या !, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 01:44 PM2021-08-02T13:44:19+5:302021-08-02T13:44:44+5:30
Uddhav Thackeray: घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावरील उड्डाणपुलाने प्रवासातला वेळ वाचला. आता पुलाच्या आजुबाजूच्या वसाहतींना चांगली घरे देणे, बकाल वस्त्यांची सुधारणा, तेथील नागरिकांचे राहणीमान उंचावेल, यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने काम करणे आवश्यक आहे.
मुंबई : घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावरील उड्डाणपुलाने प्रवासातला वेळ वाचला. आता पुलाच्या आजुबाजूच्या वसाहतींना चांगली घरे देणे, बकाल वस्त्यांची सुधारणा, तेथील नागरिकांचे राहणीमान उंचावेल, यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने काम करणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढाकार घ्यावा. अशा जनहिताच्या कामांसाठीच लोकप्रतिनिधींना निवडून दिलेले असते, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सांगितले.
वीरमाता जिजाबाई भोसले मार्गावर (घाटकोपर-मानखुर्द जोडमार्ग) महापालिकेने बांधलेल्या नवीन उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, वीरमाता जिजाबाई भोसले मार्गावर (घाटकोपर-मानखुर्द जोडमार्ग) बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलामुळे प्रवासातील अनावश्यक वेळ वाचेल. वाहतूककोंडीतून सुटका होईल.
घाटकोपर-मानखुर्द जोडरस्ता हा सायन-पनवेल महामार्ग आणि पूर्व द्रुतगती मार्ग या दोहोंना जोडणारा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर पूर्व द्रुतगती मार्ग, सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता तसेच पूर्व मुक्त मार्गावरून येणाऱ्या वाहनांमुळे नेहमी वाहतूककोंडी होत होती. त्यावर उपाय म्हणून सुमारे तीन किलोमीटर लांबीचा नवीन उड्डाणपूल बांधण्यात आला. हा उड्डाणपूल हा शिवाजीनगर, बैंगनवाडी, देवनार क्षेपणभूमी व मोहिते पाटील नगर हे चार महत्त्वाचे जंक्शन त्यासोबत देवनार नाला, चिल्ड्रेन एड नाला, पी.एम.जी.पी. नाला अशा तीन मोठ्या नाल्यांवरून जातो.