आता तिकीट खिडक्यांसमोर रांगाच रांगा

By Admin | Published: January 6, 2017 04:57 AM2017-01-06T04:57:50+5:302017-01-06T04:57:50+5:30

मुंबई उपनगरीय मार्गावरील तिकीट खिडक्यांसमोरील रांगांतून सुटका करण्यासाठी एटीव्हीएम मशिन प्रवाशांच्या सेवेत आणण्यात आल्या.

Now the front row rows the front of the ticket windows | आता तिकीट खिडक्यांसमोर रांगाच रांगा

आता तिकीट खिडक्यांसमोर रांगाच रांगा

googlenewsNext

मुंबई : मुंबई उपनगरीय मार्गावरील तिकीट खिडक्यांसमोरील रांगांतून सुटका करण्यासाठी एटीव्हीएम मशिन प्रवाशांच्या सेवेत आणण्यात आल्या. मात्र नोव्हेंबर महिन्यापासून लागू करण्यात आलेली नोटाबंदी आणि सुट्या पैशांचा अभाव यामुळे एटीव्हीएमचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. मध्य रेल्वेवर प्रवाशांकडून वापर वाढलेला असतानाच मोठ्या प्रमाणात एटीव्हीएममध्ये बिघाडाचे प्रमाणही वाढले आहे. ५९१ एटीव्हीएमपैकी १३५ मशिन बंदच असून, त्यामुळे तिकीट खिडक्यांसमोर रांगा लावण्याशिवाय प्रवाशांना पर्याय राहिला नाही.
तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना तिकीट खिडक्यांसमोर तासन्तास रांगेत उभे राहावे लागत होते. यातून सुटका करण्यासाठी मुंबईतील रेल्वे स्थानकांवर काही वर्षांपूर्वी एटीव्हीएम मशिन्स बसविण्यात आल्या. स्मार्ट कार्डद्वारे एटीव्हीएम मशिनमधून प्रवाशांना त्वरित तिकीट उपलब्ध होत असल्याने या सेवेला उत्तम प्रतिसाद मिळू लागला. परिणामी मध्य रेल्वेने एटीव्हीएम मशिन्सची संख्या वाढविली. सध्या मुंबईतील रेल्वे स्थानकांवर ५९१ एटीव्हीएम मशिन्स आहेत. परंतु गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक दिवशी सरासरी १00 मशिनींमध्ये बिघाड होत मध्यंतरी त्याचे प्रमाण १६५ पर्यंत पोहोचले. मशिनमधील बिघाड दुरुस्त केल्यानंतर हे प्रमाण १३५पर्यंत खाली आले. प्रत्येक स्टेशनवर एटीव्हीएम मशिन बिघाडाचे प्रमाण हे ४ ते ५ एवढे आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील सायन, मुलुंड, घाटकोपर, ठाणे, कळवा, कल्याण, डोंबिवली तर हार्बर मार्गावरील गोवंडी, जुईनगर, वाशी, वडाळा, टिळकनगर स्थानकांतील एटीव्हीएम मशिनमध्ये बिघाडाचे प्रमाण जास्त आहे.


एटीव्हीएममधील प्रिंटर आणि तिकिटे कापणाऱ्या कटरमध्ये बिघाड होत आहे. प्रवाशांकडून त्याचा जादा वापर केला जात असल्यानेही हे बिघाड होत असल्याचे सांगण्यात आले. सध्या नोटाबंदीनंतर एटीव्हीएममधून तिकिटे काढण्यास प्रवाशांना सोयीचे पडते आहे. मात्र अनेक मशिन्स बंदच असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

एटीव्हीएमला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळावा यासाठी पाच टक्के सवलतही देण्यास सुरुवात केली. त्यामुळे आणखी प्रतिसाद वाढत गेला. परंतु गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक बिघाडाचे प्रमाण वाढत गेल्याने प्रवाशांकडून रोष व्यक्त केला जात आहे. पश्चिम रेल्वेवरही बिघाडाचे प्रमाण अधिक असल्याचे सांगण्यात येते.

उपनगरीय प्रवासी एकता महासंघाचे सदस्य नंदकुमार देशमुख यांनी सांगितले की, एटीव्हीएम मशिनमध्ये बिघाड अधिक होत आहेत. त्यामुळे प्रवासी पुन्हा तिकीट खिडक्यांसमोर रांगा लावताना दिसतात. एटीव्हीएम मशिनमधील बिघाड दुरुस्त करुन प्रवाशांना दिलासा रेल्वेने द्यावा.

Web Title: Now the front row rows the front of the ticket windows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.