Join us  

आता झटपट मिळणार पासपोर्ट; मुंबईतून दररोज पाच हजार पासपोर्टचे वितरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 10:54 AM

देशात पासपोर्ट काढणाऱ्या नागरिकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : देशात पासपोर्ट काढणाऱ्या नागरिकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून, मुंबई शहरातील पासपोर्ट कार्यालयातून दिवसाकाठी पाच हजारांवर पासपोर्ट जारी केले जात आहेत. एकीकडे पासपोर्ट काढणाऱ्या नागरिकांच्या संख्येत जरी मोठी वाढ होत असली तरी तितक्याच सक्षमतेने आणि जलदरीत्या पासपोर्ट वितरित केले जात आहेत. 

पासपोर्टसाठी अर्ज कसा करावा ?

पासपोर्ट विभागाची स्वतःची वेबसाइट असून, तेथे अर्जदारांनी अर्ज भरावा. मात्र, अलीकडच्या काळात अनेक लोकांनी पासपोर्टसाठी अर्ज करा किंवा पासपोर्ट काढा, अशा बनावट वेबसाइट सुरू केल्या आहेत. त्या वेबसाइटदेखील विभागाच्या वेबसाइटसारख्याच हुबेहूब केलेल्या आहेत. त्यामुळे अशा वेबसाइटच्या माध्यमातून अर्ज भरू नये किंवा त्यावर पैसेदेखील भरू नयेत. या वेबसाइट निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा जास्त शुल्काची आकारणी करतात. तसेच अर्ज भरल्यानंतर तुम्हाला तुमची पासपोर्टसाठीची अपॉइंटमेंट झाल्याचेही सांगतात. पण, ते सत्य नाही. ती फसवणूक आहे. त्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज भरणा करावा.

मुंबईत पासपोर्ट कार्यालये किती ?

प्रादेशिक पारपत्र विभागाची मुंबईत ५ कार्यालये आहेत, तर १४ पोस्ट ऑफिसच्या माध्यमातूनदेखील पासपोर्ट जारी करण्याचे काम सध्या सुरू आहे.

पोलीस पडताळणी कशी होते?

१)  पहिल्यांदाच जर कुणी पासपोर्ट काढत असेल तर पासपोर्ट काढणाऱ्या व्यक्तीची पोलीस पडताळणी झाल्यानंतर त्याचा पासपोर्ट जारी होतो.

२)  जर पासपोर्टचे नूतनीकरण असेल तर अशावेळी त्याने अर्ज केल्यानंतर त्याला पासपोर्ट मिळतो आणि त्यानंतर त्याची पोलीस पडताळणी होते.

३)  जर एखाद्या व्यक्तीला आधी पासपोर्ट मिळाला असेल आणि पोलीस पडताळणीमध्ये त्या व्यक्तीवर गुन्हा असल्याची माहिती मिळाली तर त्या व्यक्तीला नोटीस जारी केली जाते. त्या नोटिशीद्वारे संबंधित व्यक्तीला त्याचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते. त्यानंतर योग्यतेनुसार किंवा गरज भासल्यास त्या व्यक्तीचा पासपोर्ट निलंबित देखील केला जातो.

४)   सहा वर्षांच्या आतील मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांची पोलीस पडताळणी होत नाही.

टॅग्स :मुंबईपोलिस