मुंबई: पश्चिम रेल्वेनं प्रवाशांसाठी 'ऑपरेशन ५ मिनिट' सुरू केलं आहे. प्रवाशांना लवकर तिकीट मिळावं यासाठी या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. रांगेत उभं राहून तिकीट घेणाऱ्या प्रवाशांना लवकरात लवकर तिकीट मिळावं, या उद्देशानं 'ऑपरेशन ५ मिनिट' अभियान सुरू करण्यात आल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. पश्चिम रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानकांवर 'ऑपरेशन ५ मिनिट'बद्दल जनजागृती केली जात आहे. याबद्दलची माहिती जास्तीत जास्त प्रवाशांपर्यंत पोहोचावी यासाठी रेल्वे स्थानकांवर पोस्टर लावण्यात आले आहेत. रेल्वे प्रवाशांना पाच मिनिटांमध्ये तिकीट देण्याचं आश्वासन देते, असा मजकूर या पोस्टरवर आहे. जर एखाद्या प्रवाशाला पाच मिनिटांत तिकीट न मिळाल्यास ती व्यक्ती पोस्टरवर देण्यात आलेल्या फोन नंबरवर कॉल करुन तक्रार करू शकते. याची दखल रेल्वेकडून घेतली जाणार आहे.रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी काही दिवसांपूर्वी यूटीएस अॅप सुरू करण्यात आलं. यामुळे अनारक्षित तिकीट सेवादेखील ऑनलाइन झाली. यूटीएस अॅपमुळे कोणत्याही रेल्वे स्थानकावरुन अनारक्षित तिकीट घेता येतं. आयआरसीटीसीकडून चालवल्या जाणाऱ्या ऑनलाइन तिकीट बुकिंग सेवेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सध्या ऑनलाइन तिकीट बूक करणाऱ्यांचं प्रमाण ७० टक्के इतकं आहे. राजधानी आणि शताब्दीसारख्या गाड्यांची बहुतांश तिकीटं ऑनलाइन बुक होत असल्याची माहिती रेल्वेनं दिली.
रेल्वेचं 'ऑपरेशन ५ मिनिट'; वेळेत तिकीट न मिळाल्यास...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 2:56 PM