आता सोने खरेदी-विक्रीसाठी गोल्ड एक्स्चेंज स्पॉट!, सराफा बाजारात उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 07:11 AM2018-02-02T07:11:23+5:302018-02-02T07:11:36+5:30
अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर सराफा बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोने खरेदी-विक्रीसाठी गोल्ड एक्स्चेंज स्पॉटची केलेली घोषणा सोने ग्राहकांसाठी फायद्याची ठरणार आहे.
मुंबई : अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर सराफा बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोने खरेदी-विक्रीसाठी गोल्ड एक्स्चेंज स्पॉटची केलेली घोषणा सोने ग्राहकांसाठी फायद्याची ठरणार आहे. तर ग्रामीण भाग आणि शेतीसाठी केलेल्या भरीव उपाययोजनांचा अप्रत्यक्ष फायदा सराफांना होणार असल्याचा दावा आॅल इंडिया जेम्स अॅण्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनचे अध्यक्ष नितीन खंडेलवाल यांनी केला आहे.
खंडेलवाल यांनी सांगितले की, सोन्यासाठी आखण्यात येणाºया धोरणासंदर्भात निती आयोगासोबत फेडरेशनची बैठक सुरू आहे. सोन्यावरील आयात शुल्क कमी करण्याची मागणी अद्याप प्रलंबित असली, तरी जीएसटी वाढ केली नसल्याचा दिलासा सराफांना मिळाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गोल्ड एक्स्चेंज स्पॉटमुळे शेअर मार्केटप्रमाणे ग्राहकांना सोने खरेदी-विक्री करता येणार आहे. शेअर मार्केटमध्ये १० टक्के कराचा अंतर्भाव केल्याने सोने गुंतवणुकीकडे कल वाढेल. अर्थसंकल्पात ग्रामीण आणि शेतीवर अधिक गुंतवणूक केल्याचा फायदाही सराफांना होणार आहे. कारण सराफांचा सर्वात मोठा ग्राहकवर्ग हा शेतकरी आहे. या गुंतवणुकीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत खेळते भांडवल उपलब्ध होईल. शेतकरीवर्गाची आजही गुंतवणुकीसाठी पहिली पसंती दागिन्यांना आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पामुळे सराफांना अच्छे दिन येण्याची अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी व्यक्त केली आहे.
आयात शुल्क कपातीची प्रतीक्षा कायम
अर्थसंकल्पात सोन्याच्या आयात शुल्कात कपात केली नसल्याने सराफांची काही प्रमाणात निराशा झाल्याचे म्हणता येईल. मात्र गोल्ड पॉलिसीचा उल्लेख करून अर्थमंत्र्यांनी सराफांच्या समस्यांवर तोडगा काढण्याचे गाजर दाखवले आहे. गोल्ड एक्स्चेंज स्पॉटद्वारे ग्राहक आणि सराफांमधील एक अनावश्यक साखळी तोडण्याचे काम अर्थमंत्र्यांनी चोखपणे केल्याने आयात कमी होण्याची शक्यता सराफा बाजाराने व्यक्त केली आहे.