आता ग्रामपंचायतींना मिळणार वाढीव निधी; मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 06:22 PM2023-11-17T18:22:05+5:302023-11-17T18:22:32+5:30
बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ
मुंबई - राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते आमने-सामने आले आहेत. तर, दुसरीकडे दिवाळीनिमित्त आपापल्या मतदारसंघांच्या दौऱ्यावर असल्याने शिंदेंचे अनेक मंत्री मंत्रालयातील आजच्या कॅबिनेट बैठकीला आले नाहीत. त्यातच, मुख्यमंत्रीएकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळाने आज महत्वाचे सहा निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये, राज्यातली कमी लोकसंख्येच्या ग्रामपंचयतींसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढविण्याचा तसेच बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे होते. आता ही योजना २०२७-२८ या वर्षापर्यंत राबविण्यात येईल. स्वतंत्र इमारत नसलेल्या २००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीना १५ लाख ऐवजी २० लाख रुपये व २००० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना १८ लाख ऐवजी २५ लाख अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच, यापुर्वी ग्रामपंचायत स्वनिधीची असलेली अट देखील रद्द करण्यात आली आहे.
#मंत्रिमंडळनिर्णय#CabinetDecisionspic.twitter.com/UP18weJZrh
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 17, 2023
ग्रामपंचायत बांधकामासाठी यापेक्षा अधिक निधीची आवश्यकता अतिरिक्त निधी केंद्र व राज्य शासनाच्या इतर योजना, वित्त आयोग निधी, जिल्हा ग्राम विकास निधी, स्थानिक विकास निधी (खासदार,आमदार निधी) इ. बाबींमधून देण्यात येईल. राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वत:चे कार्यालय नाही, अशा ४२५२ ग्रामपंचायतींना स्वत:चे कार्यालय बांधण्यासाठी मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेस २०१८- १९ ते २०२१ – २२ या ४ वर्षांसाठी मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार १७४८ ग्रामपंचायतींना स्वत:चे कार्यालय बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. या ग्रामपंचायत इमारतींचे बांधकाम सुरु असून, याकरीता आतापर्यंत ३८१३.५० लाख रुपये इतका निधी खर्च करण्यात आला आहे.