Join us  

आता कर्नाक पुलावरही हातोडा

By admin | Published: January 12, 2016 2:53 AM

सॅण्डहर्स्ट रोड स्थानकाजवळील १३६ वर्षे जुना असलेला ब्रिटिशकालीन हँकॉक पूल ब्लॉक घेऊन तोडण्यात आला. त्यापाठोपाठ आता मशीद बंदर स्थानकाजवळील ब्रिटिशकालीन कर्नाक पुलावरही

- सुशांत मोरे,  मुंबईसॅण्डहर्स्ट रोड स्थानकाजवळील १३६ वर्षे जुना असलेला ब्रिटिशकालीन हँकॉक पूल ब्लॉक घेऊन तोडण्यात आला. त्यापाठोपाठ आता मशीद बंदर स्थानकाजवळील ब्रिटिशकालीन कर्नाक पुलावरही लवकरच हातोडा पडणार आहे. या कामाची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नसली तरी या कामासाठी सुमारे ३० तासांचा ब्लॉक घेण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मध्य रेल्वेवर पुढच्या काळात आणखी ३ मोठे ब्लॉक घेण्यात येणार आहेत. हँकॉक पुलाप्रमाणेच कर्नाक पुलाची उंची कमी आहे. हा पूलही मध्य रेल्वेसाठी डोकेदुखी बनलेला आहे. सुमारे १४६ वर्षे जुना असलेला हा पूल पाडून त्याऐवजी नवीन पूल उभारण्यात येईल, अशी माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. कर्नाकच्या कामाबरोबरच आणखी ३ मोठी कामे मध्य रेल्वेला करायची आहेत. त्यात हार्बरवासीयांसाठी महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या १२ डबा लोकल गाड्यांसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यासाठी सीएसटी स्थानकातील हार्बरवरील ९ डबा लोकलसाठी १ आणि २ नंबर प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. तसेच यार्डचेही नूतनीकरण होईल. या कामासाठी आत्तापर्यंतचा सर्वांत मोठा ७२ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. फेब्रुवारीत हे काम होईल. या कामाचीही तारीख अजून निश्चित करण्यात आलेली नाही. या महत्त्वाकांक्षी कामासाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने प्रस्ताव तयार केलेला आहे. त्या वेळी हार्बर सेवा वडाळा आणि कुर्लापर्यंतच सुरू ठेवली जाईल. ठाणे ते दिवादरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गाचे काम सुरू आहे. यात काही महत्त्वाची आणि मोठी कामे असून, त्यासाठीही ब्लॉक घेण्यात येणार आहे. दिवा यार्ड आणि ठाणे यार्डाचे काम केले जाणार आहे. त्यासाठीही हा ब्लॉक घेतला जाईल. काही दिवस काम सुरू राहणार असल्याने लोकल गाड्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. डीसी-एसी परावर्तनासाठी सात तासांचा ब्लॉकहार्बरवर डीसी ते एसी परावर्तनसाठी ६ ते ७ तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. पनवेलपर्यंत हे काम सुरू राहणार असल्याने मध्यरात्रीपासूनच कामाला सुरुवात केली जाईल. त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या पहाटेच्या लोकल सेवेवर काहीसा परिणाम होईल. या ब्लॉकचीही तारीख निश्चित नाही.