आता पंतप्रधान निवासासमोर होणार हनुमान चालिसा पठण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्याची घोषणा, अमित शाहांकडे मागितली परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 11:25 AM2022-04-25T11:25:45+5:302022-04-25T11:26:35+5:30
Hanuman Chalisa News: मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान दिल्यानंतर ओढवलेल्या वादानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण आणि दुर्गा पाठ करण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
मुंबई - राज्यामध्ये सध्या हनुमान चालिसा पठणावरून मोठा वाद उफाळलेला आहे. दरम्यान, राणा दाम्पत्याने मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान दिल्यानंतर ओढवलेल्या वादानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण आणि दुर्गा पाठ करण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या फहमिदा हसन यांनी ही घोषणा केली असून, त्यांनी त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना पत्र लिहून परवानगी आणि वेळ मागितली आहे.
याबाबत एनसीपीच्या कार्यकर्त्या फहमिदा हसन यांनी सांगितले की, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण आणि दुर्गा पाठ करू इच्छितात. त्याबाबत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना पत्र लिहिलं आहे. फहमिदा हसन यांनी सांगितले की, त्या नेहमी आपल्या घरामध्ये हनुमान चालिसा पठण आणि दुर्गा पूजा करतात. मात्र ज्याप्रकारे देशात महागाई आणि बेरोजगारी वाढत आहे. ते पाहून पंतप्रदान नरेंद्र मोदी यांना झोपेतून जागे करण्याची आवश्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण केल्याने रवी राणा आणि नवनीत राणा यांना महाराष्ट्राचा फायदा दिसत आहे. तर देशाचा फायदा करण्यासाठी पंतप्रधान निवासस्थानी जाऊन हनुमान चालिसा पठण आणि दुर्गापाठ करणे आवश्यक आहे, असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोणषा करणाऱ्या नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. तसेच राणा दाम्पत्य सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.