- स्नेहा मोरेमुंबई : ई-साहित्य क्षेत्रातील ‘ब्रोनॅटो’ ही संस्था नवीन वर्षात साहित्य क्षेत्रासाठी सुखद वार्ता घेऊन आली आहे. पहिल्यांदाच ‘ब्रोनॅटो’ संस्थेने साहित्यिकांसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील हेल्पलाइन सुरू केली असून या माध्यमातून साहित्यिकांच्या वितरण, प्रकाशन, लेखन आणि मार्केटिंगविषयी समस्या नि:शुल्क पद्धतीने सोडविण्याचे काम केले जाणार आहे. या हेल्पलाइनच्या सेवेद्वारे खेड्या-पाड्यातील तरुणपिढीला साहित्य लिखाणाची नवप्रेरणा मिळावी आणि ज्येष्ठ साहित्यिकांना ई-साहित्य क्षेत्राविषयीचे ज्ञान मिळावे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.आजही साहित्य क्षेत्रात येणाऱ्या नव्या पिढीला आपल्या लिखाणाविषयी मार्गदर्शन मिळत नाही. शिवाय, एखादे पुस्तक लिहिल्यास त्यात प्रकाशन, वितरणाविषयी अनेक अडचणी येतात. त्याचप्रमाणे, सध्या सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावात साहित्य क्षेत्राने टिकाव धरणे हे मोठे आव्हान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर ही हेल्पलाइन नवलेखकांसाठी तसेच अनेक जुन्या पिढीतील साहित्यिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.यासाठी ९९७००५१४१३ या क्रमांकावर संपर्क करून साहित्यिकांनी आपली समस्या सांगितल्यास ब्रोनॅटोचे प्रतिनिधी त्याचे निराकरण करणार आहेत. तसेच, साहित्यिकांना आपले साहित्य अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मार्केटिंगच्या संकल्पनांविषयी मार्गदर्शन करणार आहेत.वितरणाच्या समस्यांचे प्रमाण अधिकयाविषयी, ब्रोनॅटोचे शैलेश खडतरे यांनी सांगितले की, ही हेल्पलाइन सुरू झाली असून राज्याच्या कानाकोपºयातून नवलेखकांचे फोन येत आहेत. त्यात मुख्यत: वितरणाच्या अधिक समस्या असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय, काही लेखकांनी सोशल मीडियावरील लाइक्सचा साहित्य वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी किती उपयोग होतो, याविषयी प्रश्न विचारले आहेत. त्याप्रमाणे या लेखकांना सोशल मीडियाच्या आणि वाचकांच्या प्रतिक्रियांविषयी विश्लेषण करून मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच आजही बºयाच ज्येष्ठ साहित्यिकांकडे आपल्या पुस्तकांचे ई-बुक उपलब्ध नाही, याविषयी मदतीचे कॉल येत असून त्याकरिता त्यांना मार्गदर्शन करून साहित्याचे ई-रूपांतर करण्यात येत आहे. मात्र ही हेल्पलाइन अधिकाधिक साहित्यिकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे.
आता साहित्यिकांसाठी हेल्पलाइन; वितरण आणि प्रकाशनाच्या समस्या सुटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2019 2:07 AM