मुंबई : वांद्रे टर्मिनसवर रविवारी पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर पश्चिम रेल्वेने अनारक्षित तिकीट प्रवाशांसाठी नवीन होल्डिंग क्षेत्र तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. हे होल्डिंग क्षेत्र तत्काळ अमलात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. दररोज लांब पल्ल्याच्या काही अनारक्षित गाड्यांना मोठी गर्दी होत असल्याने नव्या निर्णयामुळे या गर्दीवर नियंत्रण मिळवणे सोपे होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
वांद्रे टर्मिनसवर २४० चौरस मीटर क्षेत्रफळावर पूर्वीच्या पार्किंग झोनमध्ये पोर्चच्या पलीकडे हे होल्डिंग क्षेत्र तयार करण्यात आले आहे. अनारक्षित जनरल डब्यांच्या प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर थांबण्याऐवजी होल्डिंग एरियामध्ये थांबवण्यात येईल आणि प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या ठिकाणी सुमारे ५०० प्रवाशांना एका वेळी थांबवता येऊ शकेल. परिणामी प्लॅटफॉर्मवरील लांब रांगा आणि गर्दी कमी होणार आहे. या प्रवाशांना ट्रेन आल्यावर प्लॅटफॉर्मवर सोडण्यात येईल. तसेच यापुढे कोणत्याही प्रवाशाला प्लॅटफॉर्मवर ट्रेन येण्याआधी जास्त वेळ बसण्याची परवानगी दिली जाणार नाही, याची जबाबदारी रेल्वे पोलिसांना दिल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
दुर्घटना अशा राेखणार... जनरल डब्यातील अनारक्षित तिकीट घेतलेले प्रवासी अनेकदा जागा सुरक्षित करण्यासाठी स्थानकावर लवकर पोहोचतात आणि प्लॅटफॉर्मवर गर्दी करतात. वांद्रे टर्मिनसवर रविवारी घडलेल्या घटनेत, गोरखपूर ट्रेनच्या आगमनाने अनपेक्षित गर्दी झाली. काही प्रवाशांनी ती थांबण्याआधीच चढण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर प्लॅटफॉर्मच्या बाहेर सुरक्षित वेटिंग स्पेस तयार करून अशा घटना रोखणे हे होल्डिंग एरियाचे उद्दिष्ट असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.