"आता, ते अधिकार माझ्याकडे"; धर्मवीर २ सिनेमाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 10:22 AM2023-12-12T10:22:10+5:302023-12-12T11:01:37+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ठाणे येथे गेल्याच महिन्यात धर्मवीर २ सिनेमाचा मुहूर्त साधण्यात आला
मुंबई - दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपटातून स्वर्गीय आनंद दिघे यांचा जीवनप्रवास मांडण्यात आला होता. या चित्रपटास प्रेक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. आता “धर्मवीर २” सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी हा चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे. त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ठाणे येथे गेल्याच महिन्यात सिनेमाचा मुहूर्त साधण्यात आला. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक ,कलाकार, तंत्रज्ञ तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होती. तर, ९ डिसेंबरपासून ठाणे येथे चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवातही झाली आहे.
अभिनेता प्रसाद ओक यांनी आनंद दिघेंची साकारलेली भूमिका सर्वांनाच अंचिबत करुन गेली. त्यामुळे, आता दुसऱ्या भागात नेमकं काय दाखवलं जाईल, याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. कारण, पहिल्या चित्रपटात आनंद दिघेंनंतर एकनाथ शिंदेंवरच प्रकाश टाकण्यात आला होता. त्यातच, आता शिवसेनेत झालेली बंडाळी आणि दिघेंचा शिष्य राज्याचा मुख्यमंत्री बनला आहे. त्यामुळे, या सिनेमाचीही उत्सुकता आहे. तर, एकनाथ शिंदेंच्या विधानाने ही उत्सुकता आणखी वाढली आहे.
सिनेमाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना एकनाथ शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केला. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा सिनेमा आला होता, त्यावेळी काही जण अर्ध्यातूनच उठून गेले. या सिनेमातील काही सीन त्यांना आवडले नाहीत, त्यावर सेन्सॉर आलं होतं. पण, आता जे आहे ते वास्तव दाखवण्याचे अधिकार माझ्याकडे आहेत. म्हणजे दिघेसाहेबांचं सगळं, कारण ते एका सिनेमात मावू शकत नाहीत, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी या सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढवली आहे.