Coronavirus News: आता हायप्रोफाईल परिसरात वाढला कोरोनाचा धोका; धारावी नियंत्रणात, पण आव्हान कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 01:44 AM2020-07-19T01:44:37+5:302020-07-19T06:08:31+5:30
वांद्रे, सांताक्रुझ पूर्व, एच पूर्व प्रभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १५३ दिवसांचा आहे.
मुंबई : चार महिन्यांनंतर मुंबईमधील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५४ दिवसांवर पोहोचला आहे. तर रुग्ण वाढीचा वेगदेखील १.७२ टक्क्यांवरून १.३० टक्क्यांवर आला आहे. आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी मानल्या जाणाऱ्या धारावीतही कोरोना नियंत्रणात आला आहे. मात्र आता हायप्रोफाईल परिसरात कोरोना परसत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
वांद्रे, सांताक्रुझ पूर्व, एच पूर्व प्रभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १५३ दिवसांचा आहे. शहर, उपनगरात कुलाबा ए विभाग आणि वांद्रे, खार, सांताक्रुझ पश्चिम, एच पश्चिम विभागांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या दोन विभागांतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी घटला असून वाढीचा दर वाढला आहे. ए विभागात १३ जुलै रोजी कोरोनाचे रुग्ण ६२ दिवसांत दुप्पट होत होते. १७ जुलैपर्यंत हा कालावधी ४३ दिवसांपर्यंत आला आहे. तर एच पश्चिममध्ये हा कालावधी ४६ दिवसांवरून ४३ दिवसांवर आल्याची माहिती पालिकेने दिली.
बोरीवली आर मध्य या एकमेव विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २८ दिवसांवर स्थिर असल्याचे दिसून आले. ए विभागात १३ जुलैपर्यंत २,०९८ रुग्ण आढळले होते. तर, १७ जून रोजी २,२४६ रुग्ण नोंदविण्यात आले. १३ जुलै रोजी कोरोनाच्या रुग्णवाढीत या प्रभागाचा क्रमांक १७ होता आता पाचवर आला आहे. एच पश्चिम प्रभागात १३ जुलैपर्यंत २,३९३ रुग्ण होते. तर १७ जुलैपर्यंत २,५४७ रुग्ण आढळले. या प्रभागाचा क्रमांक आठवरून सहावर घसरला.
केवळ बोरीवली प्रभागातील दर दोन टक्क्यांपेक्षा जास्त २.५ टक्क्यांवर स्थिर आहे. ए विभागातील रुग्ण वाढीचा दर १.१ टक्क्यांवरून १.६ टक्क्यांवर, तर एच पश्चिम प्रभागातील दर १.५ टक्क्यांवरून १.६ टक्क्यांवर आला आहे. मुलुंड टी, ग्रॅण्ट रोड, कांदिवली आर दक्षिण आणि आर उत्तर दहिसर या प्रभागातील रुग्णवाढीचा दर पूर्वी दोन टक्क्यांपेक्षा जास्त होता. आता मुलुंड २ टक्के, ग्रॅण्ट रोड २ टक्के, कांदिवली १.९ आणि दहिसर १.६ टक्क्यांवर आला आहे.मुंबईत कोरोनामुळे झालेल्या मृतांपैकी अन्य कारणांमुळे झालेले मृत्यू २९१ आहेत.
देशाच्या तुलनेत मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक
शहर, उपनगरात ७० टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली असून हा दर देशाच्या आणि राज्याच्या सरासरी दरापेक्षा जास्त आहे. तर, दिल्लीतील कोरोनामुक्तीचा दर मुंबईपेक्षा जास्त आहे. कोरोनामुक्तीचा दर ५५ टक्के असून देशातील रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ५२ टक्के आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि देशाच्या तुलनेत मुंबईचा रिकव्हरी रेट खूप जास्त आहे. पालिकेने ‘मिशन झीरो’ ही मोहीम हाती घेतल्याने१५ जुलैपर्यंत ७० टक्के रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.