आता कोविड केंद्रांमध्ये माहिती व्यवस्थापन प्रणाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:05 AM2021-02-07T04:05:47+5:302021-02-07T04:05:47+5:30
मुंबई महापालिकेचा निर्णय लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई शहरातील कोविड महामारीचे व्यवस्थापन व नियंत्रण करण्यासाठी प्रमुख यंत्रणा कार्यान्वित ...
मुंबई महापालिकेचा निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहरातील कोविड महामारीचे व्यवस्थापन व नियंत्रण करण्यासाठी प्रमुख यंत्रणा कार्यान्वित आहे. योग्य वेळी, योग्य माहिती, योग्य स्वरूपात उपलब्ध झाल्यामुळे महापालिकेस कोविड महामारीचे व्यवस्थापन व नियंत्रणासाठी योग्य निर्णय घेणे शक्य झाले. त्यासाठी महापालिकेने नवीन पुनरुत्पादित आयटी साधने आणि अनुप्रयोगांचा उपयोग करून कोविड -१९ या साथीमध्ये व्यवस्थापन केले आहे. कोविड -१९ माहिती व्यवस्थापन प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी पालिकेकडून निविदा मागविण्यात आल्या असून कंत्राटदाराशी करार करण्यात आला आहे.
पालिकेने २०२०-२१ या सुधारित अंदाजात ४७.३७ कोटी आणि २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात ५१.८९ कोटींची तरतूद केली आहे. याशिवाय, आरोग्य विषयक मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी पालिकेने रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणालीची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. या प्रणालीमध्ये विविध विभागांचे एकूण ३४ मोड्युल्स अंतर्भूत आहेत. कस्तुरबा, नायर, कूपर, आंबेडकर व राजावाडी रुग्णालय तसेच नायर रुग्णालयांच्या परिसरातील पाच दवाखान्यांमध्ये जून २०१८ पासून आराेग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली कार्यरत आहे. नेस्को कोविड केंद्र व सेव्हन हिल्स रुग्णालय येथेही आरोग्य माहिती व्यवस्थापन सेवा प्रणाली कार्यरत आहे. या प्रणालीची नजीकच्या काळात महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये अंमलबजावणी केली जाईल.
................................