मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील राजधानी एक्स्प्रेसचा वेग वाढविण्यासाठी आणि प्रवाशांचा वेळ वाचविण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासन राजधानी एक्स्प्रेसला पुश-पुल प्रकारातील इंजिन जोडणार आहे. त्यामुळे १४ तासांत मुंबई ते दिल्ली प्रवास करणे शक्य होणार असून प्रवासासाठीचा सुमारे दीड तासाचा वेळ वाचविणे शक्य होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल ते दिल्लीपर्यंतचे अंतर १ हजार ३८४ किमी आहे. हे अंतर कापण्यासाठी सध्या राजधानी एक्स्प्रेसला १५ तास ५७ मिनिटे एवढा वेळ लागतो. मात्र पुश-पुल इंजीन लावल्यास सुमारे दीड तासाचा वेळ वाचविला जाणार असून सुमारे १४ तासांत प्रवास होणार आहे. राजधानी एक्स्प्रेसवर पुश-पुल इंजीन लावून चाचणी घेण्यात येत असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले.
पश्चिम रेल्वे मार्गावरून गाडी क्रमांक १२९५१ आणि १२९५२ राजधानी एक्स्प्रेस चालविण्यात येते. ही एक जलदगती प्रवासी मेल, एक्स्प्रेस आहे. राजधानी एक्स्प्रेस देशातील दोन मोठ्या शहरांना जोडत असल्याने राजधानी एक्स्प्रेसला अनन्यसाधारण महत्त्व आहे. १९७२ साली या मार्गावरून राजधानी एक्स्प्रेस सुरू झाली आणि प्रवाशांत लोकप्रिय झाली. दरम्यान, ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीकालीन वेळेत जेट एअरवेज बंद झाल्याने मुंबईकरांना दिल्लीला जाण्यासाठी इतर विमान सेवांचा वापर करावा लागत आहे. मात्र पर्यायी विमानसेवेचा प्रवास खूप महागडा असल्याने प्रवासी दिल्ली गाठण्यासाठी राजधानी एक्स्प्रेसला पसंती देत असल्याचे पाहायला मिळत आहे.
मध्य रेल्वेवर प्रयोग यशस्वीमध्य रेल्वे मार्गावरील राजधानी एक्स्प्रेसचा वेग आणि क्षमता वाढविण्यासाठी पुश-पुल प्रकारातील इंजीन जोडून चालविण्यात येत आहे. मध्य रेल्वे मार्गावर मेल, एक्स्प्रेसच्या पुढील, मागील बाजूस अशी दोन इंजीन जोडून राजधानी चालविण्यात येत असल्याने धावण्याची क्षमता वाढली असून वेळेची बचत होत आहे.
या मार्गावर हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे आता हीच सुविधा पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई ते दिल्ली प्रवास करणाºया प्रवाशांना उपलब्ध करून देण्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावरील राजधानीला पुश-पुल इंजीन जोडण्यात येणार आहे. यामुळे या राजधानीचा वेग वाढविला जाणार आहे.