मुंबई/जालना - अंतरवाली सराटी येथील उपोषणकर्ते मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. उपोषणाचा आज १४ वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावत आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी वैद्यकीय उपचारासाठी पथक आल्यानंतर जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला. त्यांनी अन्नपाणी सोडलं असून उपचारही नाकारले आहेत. मराठा आरक्षणाचा जीआर आल्यानंतरच तपासणी, उपचार घेणार असल्याची भूमिका जरांगे यांनी घेतली. तसेच, सरकारच्या सर्वपक्षीय बैठकीवरही त्यांनी भाष्य केलं.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गत १४ दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. शासनासमवेत चर्चेच्या तीने फेऱ्या अयशस्वी झाल्या असून, रविवारी सकाळपासून जरांगे यांनी पाणी पिणे, उपचार घेणे बंद केले आहे. वैद्यकीय पथक सोमवारी सकाळी वैद्यकीय पथक १०:४० वाजता उपोषणस्थळी आले होते. पथकातील डॉ. अतुल तांदळे यांनी बीपी, शुगर सह इतर तपासण्या करू द्या, अशी जवळपास अर्धा तास विनवणी केली. परंतु, जरांगे यांनी तपासणी, उपचारालाही नकार दिला. त्यामुळे, पाटील किती दिवस असंच राहतील हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
मनोज जरांगे पाटील सरकारचे आणखी एखादे शिष्टमंडळ आल्यास अन्नपाणी सुरु करतील का, असा प्रश्न त्यांना विचारला होता. त्यावर, मी समाजासाठी दोन पाऊले मागे यायला तयार आहे. पण, केवळ काही दिवसांची मुदत मागून उपयोग नाही, सरकारने आता आरक्षण दिलं पाहिजे. मराठा समाजाने गेल्या ७५ वर्षात सर्वच राजकीय पक्षांना भरभरुन दिलं आहे. त्यामुळे, आता सर्वच राजकीय पक्षांची बारी आली आहे, असे म्हणत जरांगे पाटील यांनी आजच्या बैठकीवर भाष्य केलं.
जरांगे पाटलांची भूमिका ताठर आहे, ते ऐकत नाहीत? असा प्रश्न त्यांना विचारला होता. त्यावर, बोलताना आमचे विरोधक असं बोलतीलच, मराठा समाजाचा कोणीही असं बोलत नाही. कारण, आमची मागणी मराठा समाजाच्या मुलांसाठी आहे. दररोज लाखोंच्या संख्येने लोकं भेटायला येत आहेत. आता, सरकारने विचार करावा आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी व्यक्त केली. तसेच, सर्वपक्षीय बैठकीतून काहीतरी निर्णय होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.