आता केसरकर यांचाही मुंबई महापालिका मुख्यालयात तळ
By जयंत होवाळ | Published: October 3, 2023 06:20 PM2023-10-03T18:20:45+5:302023-10-03T18:22:36+5:30
मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी मुख्यालयात तळ ठोकणार आहेत.
मुंबई उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पालिका मुख्यालयात कार्यालय स्थापन केल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांची शिवसेनाही पालिकेत सक्रिय झाली आहे. मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी मुख्यालयात तळ ठोकणार आहेत.
सध्या पालिकेचा कार्यकाल संपला आहे.नगरसेवक माजी झाले आहेत.,त्यामुळे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधीची आवश्यकता आहे,असे कारण देत भाजपने लोढा यांच्यासाठी पालिका मुख्यालयात कार्यालय थाटले आहे.त्यावरून विरोधी पक्षांनी बरीच चिडचिड केली.मात्र लोढा तळ ठोकून आहेत.लोढा यांच्या कार्यालयामुळे भाजपच्या माजी नगरसेवकांना पालिकेत वावर करणे सोपे झाले आहे.
आता केसरकर यांचीही पालिकेत एन्ट्री होत आहे.गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे.ते विविध विषयांवर पालिका प्रशासनाला सूचना करत आहे.त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू आहे.,केसरकर यांना पालिकेत आणून शिवसेनेनेही पालिका प्रशासनावरील पकड मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसते.
केसरकर हे मुंबईकर नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी दुपारी १ ते ४ या वेळेत पालिका मुख्यालयात उपलब्ध राहणार आहेत. मुख्यालयातील पहिल्या मजल्यावर नागरी कार्यालयात केसरकर नागरिकांशी संवाद साधतील,असे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले. केसरकर यांच्या नागरी संपर्कासाठी पालिकेने कार्यालय उपलब्ध करून दिले आहे.