आता स्वस्त दरात ‘लेझर’ उपचार

By admin | Published: June 27, 2017 03:41 AM2017-06-27T03:41:34+5:302017-06-27T03:41:34+5:30

त्वचेवरील चामखीळ, मुरमाचे डाग, शस्त्रक्रियेचे व्रण व पोटावरील स्ट्रेच मार्क, यावर उपचार करणारी कोरियानिर्मित लेझर मशिन फोर्ट

Now 'Laser' Treatment at Cheap Price | आता स्वस्त दरात ‘लेझर’ उपचार

आता स्वस्त दरात ‘लेझर’ उपचार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : त्वचेवरील चामखीळ, मुरमाचे डाग, शस्त्रक्रियेचे व्रण व पोटावरील स्ट्रेच मार्क, यावर उपचार करणारी कोरियानिर्मित लेझर मशिन फोर्ट येथील गोकुळदास तेजपाल (जी.टी.) रुग्णालयात दाखल झाली आहे. त्यामुळे आता खासगी रुग्णालयांवर अव्वाच्या सवा दरात केले जाणारे हे उपचार सहज आणि स्वस्त दरात रुग्णांसाठी उपलब्ध झाले आहेत. नुकताच या तंत्रज्ञानाचा शुभारंभ करण्यात आला.
गोकुळदास तेजपाल रुग्णालयाच्या त्वचा व गुप्तरोग विभागांतर्गत लेझर उपकरणे आणि शल्यचिकित्सा विभागात दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्याकरिता दोन अत्याधुनिक उपकरणे दाखल झाली आहेत. या दोन्ही उपकरणांच्या सेवेचा शुभारंभ सर जे.जे. समूह रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.तात्याराव लहाने आणि गोकुळदास तेजपाल रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मुकुंद तायडे यांच्या हस्ते करण्यात आला. खासगी रुग्णालयात त्वचाविकारांवरील उपचार खर्चिक असल्याने, सर्वसामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेरचे असतात, परंतु आता ही सेवा गोकुळदास तेजपाल (जी.टी.) रुग्णालयात उपलब्ध झाल्याने गोरगरिबांना याचा लाभ घेता येईल, असे गोकुळदास तेजपाल रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मुकुंद तायडे यांनी या प्रसंगी सांगितले.
शस्त्रक्रियेचे टाके पडू नयेत व रुग्णालयातील कालावधी कमी करण्याच्या दृष्टीने, आजच्या काळात दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्याकडे रुग्ण व डॉक्टरांचा कल आहे. त्यासाठी लागणारी अत्याधुनिक लॅप्रोस्कोपिक उपकरणे आता रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहात उपलब्ध झालेली आहेत, असे पथकप्रमुख डॉ. जितेंद्र संकपाळ यांनी सांगितले. दातांच्या उपचाराकरिता देखील दंतशल्यचिकित्सा विभागाचे श्रेणीवर्धन करण्यात आले असून, अत्याधुनिक अशी डेंटल चेअर जे.जे. रुग्णालयातील दंत विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सुबोध सोनटक्के यांनी आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ भेट दिल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Now 'Laser' Treatment at Cheap Price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.