मुंबई : अकरावी प्रवेशासाठी तिसरी प्राधान्य फेरी ही शेवटची फेरी असेल असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, तिसऱ्या प्राधान्य फेरीनंतरही शेकडो विद्यार्थी प्रवेशाविना राहिल्याने प्रवेश प्रक्रिया समितीकडून आता चौथी आणि शेवटची प्राधान्य फेरी जाहीर करण्यात आली आहे. ही फेरी ८ ते २० आॅक्टोबरदरम्यान चालणार आहे. ही शेवटची फेरी असून यानंतर ही प्रक्रिया बंद झाल्याचे जाहीर करण्यात येईल, असे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने स्पष्ट केले आहे.चौथ्या फेरीत आत्तापर्यंत प्रवेश न मिळालेले विद्यार्थी, महाविद्यालयांनी काही कारणांमुळे प्रवेश नाकारलेले विद्यार्थी, एटीकेटी, प्रवेश रद्द केलेले तसेच नव्याने नोंदणी करणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. या फेरीत विद्यार्थी आधीचे प्रवेश रद्द करूनही प्रवेश फेरीत सहभागी होऊ शकतात. विद्यार्थी सामान्य शाखेत असेल आणि त्याला बायफोकलमध्ये प्रवेश घ्यायचा असल्यास ती संधीही त्याला महाविद्यालयीन स्तरावर उपलब्ध होणार आहे. मात्र या फेरीसाठी महाविद्यालयांमधील रिक्त जागांची स्थिती ही अगदी अल्प असेल. यामुळे आधीचा प्रवेश रद्द करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी विचार करावा, असे आवाहनही उपसंचालक कार्यालयाने केले आहे.असे असेल अंतिम प्रवेश फेरीचे वेळापत्रक८ आॅक्टोबर, सकाळी ११ वाजता - रिक्त जागांचा तपशील जाहीर होणार.८ ते ९ आॅक्टोबर, सकाळी ११ ते ५-यापूर्वीचे प्रवेश रद्द करणे, महाविद्यालयांनी शिल्लक अल्पसंख्याक, इनहाउस, व्यवस्थापन जागा समर्पित करणे.९ आॅक्टोबर, रात्री ८ वाजता - रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध.१० ते १९ आॅक्टोबर, सकाळी ११ ते ५ - नवीन अर्ज सादर करणे, अपूर्ण अर्ज मंजूर करून घेणे.१० ते १९ आॅक्टोबर, सकाळी ११ ते ५ - प्राधान्य फेरी ४ मध्ये सहभागी होऊन आॅनलाइन प्रक्रियेनुसार महाविद्यालयांत जाऊन प्रवेश अद्ययावत करणे.१७ ते २० आॅक्टोबर, सामान्य शाखेत प्रवेश घेतलेले पण बायफोकलमध्ये प्रवेशेच्छुक असलेल्यांनी प्रवेश ट्रान्सफर करून घेणे.
विद्यार्थ्यांना दिलासा : अकरावी प्रवेशासाठी आता शेवटची संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2018 6:09 AM