Join us

सध्या तरी एकला चलो रे; पुढचे माहीत नाही : बाळा नांदगावकर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2021 5:29 AM

MNS News: आतापर्यंतच्या सर्व निवडणुका मनसेने स्वबळावर लढविल्या. सध्या तरी आमचे एकला चलो रे धोरण आहे. पुढचे माहीत नाही, अशा शब्दात MNS नेते Bala Nandgaonkar यांनी युतीबाबतचा निर्णय मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांच्याकडून घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले.

मुंबई : आतापर्यंतच्या सर्व निवडणुका मनसेने स्वबळावर लढविल्या. सध्या तरी आमचे एकला चलो रे धोरण आहे. पुढचे माहीत नाही, अशा शब्दात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी युतीबाबतचा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १४ डिसेंबरपासून राज ठाकरे दहा दिवसांचा महाराष्ट्र दौरा करणार असल्याचेही नांदगावकर म्हणाले.

राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या नव्या निवासस्थानी आज मनसे नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना नांदगावकर म्हणाले की, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज हे महाराष्ट्राच्या सर्व सहा विभागांचा दौरा करणार आहेत. मराठवाड्यापासून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या तारखा नक्की झाल्या आहेत. १४ डिसेंबरला औरंगाबाद, १६ला पुण्याचा कार्यक्रम ठरला आहे. कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातही राज ठाकरे जातील, असे नांदगावकर यांनी सांगितले.

या बैठकीत भाजपसोबतच्या युतीची चर्चा झाली. बहुतांश पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर निवडणुका लढविण्याची भावना व्यक्त केल्याचे समजते. शिवाय, पालिका निवडणुकीबाबतच्या रणनीतीचीही चर्चा झाली. युतीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर नांदगावकर म्हणाले की, युतीबाबतचा निर्णय राज ठाकरे घेतील. सध्या तरी आमचे एकला चलो रे असे धोरण आहे. यापूर्वीच्या सर्व निवडणुका आम्ही स्वबळावर, एकटा जीव सदाशिव या पद्धतीने लढविल्या आहेत. पुढे युती करायची का, याचा निर्णय राज ठाकरे घेतील. लवकरच याबाबतची चांगली, वाईट बातमी आपल्याला मिळेल, असा सूचक इशाराही नांदगावकर यांनी दिला.

टॅग्स :मनसेबाळा नांदगावकर