आता राणीच्या बागेत गुजरातची ‘सिंह’गर्जना; प्राणिसंग्रहालयाचे नूतनीकरण, १२0 कोटींचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 03:00 AM2018-03-23T03:00:13+5:302018-03-23T03:00:13+5:30
परदेशातून आलेल्या पेंग्विनने मुंबईकरांचे मन जिंकल्यानंतर आता भायखळ्यातील राणीच्या बागेत आणखी काही नवे पाहुणे येणार आहेत. त्यात खास गुजरातमधील जुनाबाग आणि साकरबाग या दोन प्राणिसंग्रहालयांतून जंगलचा राजा सिंह मुक्कामाला येणार आहे.
मुंबई : परदेशातून आलेल्या पेंग्विनने मुंबईकरांचे मन जिंकल्यानंतर आता भायखळ्यातील राणीच्या बागेत आणखी काही नवे पाहुणे येणार आहेत. त्यात खास गुजरातमधील जुनाबाग आणि साकरबाग या दोन प्राणिसंग्रहालयांतून जंगलचा राजा सिंह मुक्कामाला येणार आहे. त्यामुळे राजकारणाप्रमाणेच आता राणीच्या बागेतही गुजरातची ‘सिंह’गर्जना ऐकायला मिळणार आहे.
सिंगापूरस्थित झेराँग पार्कच्या धर्तीवर मुंबईतील भायखळास्थित वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान
व प्राणिसंग्रहालयाचे नूतनीकरण
सध्या सुरू आहे. यासाठी १२०
कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात दक्षिण कोरियातून हम्बोल्ट जातीचे आठ पेंग्विन मुंबईत आणण्यात
आले आहेत. त्यानंतर आता
दुसऱ्या टप्प्यात महापालिकेने आणखी काही देशी व परदेशी पाहुण्यांना आणण्याची तयारी करण्यात
आली आहे. या नव्या प्राण्यांसाठी
१७ पिंजरे तयार करण्याचे काम
सध्या सुरू करण्यात आले आहे. यासाठी सुमारे ६९ कोटी खर्च केले जाणार आहेत. या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे निधीची चिंता मिटली आहे.
सध्या राणीच्या बागेत एकही वाघ किंवा सिंह नाही. त्यामुळेच आता गुजरातहून दोन सिंह आणण्याचे ठरले आहे. या सिंहांसाठीही खास पिंजरे तयार केले जात आहेत. या पिंजºयांचे बांधकाम कसे करण्यात येईल, याचे सादरीकरण गुरुवारी करण्यात आले.
राणीबागेतील पिंजरे तयार झाल्यानंतर तसेच अन्य सर्व तयारी पूर्ण करण्यता आल्यानंतरच केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमानुसार इतर राज्यांतील प्राणिसंग्रहालयामधील प्राणी येथे आणण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
येथून येणार पाहुणे
गुजरातमधील साकरबाग आणि जुनाबाग प्राणिसंग्रहालयात अतिरिक्त सिंह आहेत. तेथून दोन सिंह आणण्यात येतील.
भोपाळमधील प्राणिसंग्रहालयातून बारशिंग आणण्यात येणार आहे. सध्या कानपूर, चेन्नई आणि औरंगाबाद येथील प्राणिसंग्रहालयात वाघ आहेत. तेथून वाघ आणण्याचे प्रयोजन आहे.
हे आहेत नवे पाहुणे : सिंह, वाघ, कोल्हा, पाणमांजर, लांडगा, देशी अस्वल, मद्रास पाँड कासव, तरस, मांजर संकुल, बिबट्या, साप, सांबर, काकर, नीलगायी, बारशिंग, चौशिंगा, काळवीट.