फॅन्सी नंबरप्लेटवर आता सीसीटीव्हीचीही नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:06 AM2020-12-06T04:06:40+5:302020-12-06T04:06:40+5:30
मुंबई : मोटार वाहन नियमांत वाहनांची नंबरप्लेट कशी असावी हे निश्चित करण्यात आले आहे. मात्र तरीही अक्षरे आणि आकड्यांची ...
मुंबई : मोटार वाहन नियमांत वाहनांची नंबरप्लेट कशी असावी हे निश्चित करण्यात आले आहे. मात्र तरीही अक्षरे आणि आकड्यांची रचना, आकार यात बदल केला जातो. अशा वाहनचालकांवर आता कारवाई सुरू करण्यात आली असून, या वाहनांवर सीसीटीव्हीमार्फत ई-चलन आकारले जात आहे, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.
वाहतूक पोलिसांनी गेल्या तीन दिवसांपासून शहर, उपनगरांत वाहनांच्या नंबरप्लेटची तपासणी सुरू केली असून नियम धुडकावणाऱ्यांना दंड केला जात आहे. शहरातील महत्त्वाच्या चौकांत, महत्त्वाच्या मार्गावर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांआधारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांना चलन पाठवले जाते. तसेच कर्तव्यावरील अधिकारी, अंमलदारांकरवी घेतलेल्या छायाचित्रांआधारेही चलन बजावले जाते. या दोन्ही कृतींमध्ये नंबरप्लेटवरील तपशील अस्पष्ट दिसल्यास चलन पाठवले जाऊ शकते. तपशील अवलोकनात किंचित फरक पडल्यास चलन भलत्याच व्यक्तीला जाऊ शकते. त्यामुळे सर्व वाहनांच्या नंबरप्लेट निश्चित प्रमाणात असाव्यात या उद्देशाने ही कारवाई हाती घेण्यात आली, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
मोटार वाहन नियमांत वाहनांची नंबरप्लेट कशी असावी हे निश्चित करण्यात आले आहे. आकडे, मुळाक्षरे आदींचे आकारही त्यात नमूद आहेत. त्यामुळे आकार किंवा ठेवणीत थोडा जरी बदल आढळल्यास संबंधित वाहन दंडास पात्र ठरू शकते. वाहतूक पोलिसांनी नियमांनुसार नसलेली वाहने शोधून त्यावर दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. वाहतूक पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आकड्यांची मोडतोड करून ‘नाना’, ‘दादा’, ‘भाई’ आदी शब्द तयार केलेल्या क्रमांक पाट्यांवरील आकड्यांचा आकार लहान असल्यास किंवा एखाद्या आकड्याचा आकार अन्य आकड्यांपेक्षा लहान किंवा मोठा करून घेतलेल्या फॅन्सी नंबरप्लेट कारवाईस पात्र ठरत आहेत. अशा वाहनचालकांकडून एक हजार रुपयांचा दंड वसूल केला जात आहे.