आता लक्ष म्हाडाच्या लॉटरीकडे!
By admin | Published: May 21, 2015 02:21 AM2015-05-21T02:21:26+5:302015-05-21T02:21:26+5:30
म्हाडाच्या १ हजार ६६ घरांसाठीची प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली असून, आता अर्ज केलेल्या सर्वच अर्जदारांचे लक्ष ३१ मे रोजी वांद्रे पश्चिमेकडील रंगशारदा सभागृहात होणाऱ्या लॉटरीकडे लागले आहे.
मुंबई : म्हाडाच्या १ हजार ६६ घरांसाठीची प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली असून, आता अर्ज केलेल्या सर्वच अर्जदारांचे लक्ष ३१ मे रोजी वांद्रे पश्चिमेकडील रंगशारदा सभागृहात होणाऱ्या लॉटरीकडे लागले आहे. तत्पूर्वी २५ मे रोजी स्वीकृत अर्जांची कच्ची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, स्वीकृत अर्जदारांची अंतिम यादी २८ मे रोजी म्हाडाकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
म्हाडाच्या वतीने सर्वसामान्यांसह अपंगांच्या घरासाठीही लॉटरी काढण्यात येणार आहे. एप्रिल महिन्यातच लॉटरीसाठीची आॅनलाइन प्रक्रिया सुरू झाली होती. गेल्या आठवड्यात नोंदणीसाठीची दिनांक उलटून गेल्यानंतर १८ मे रोजी अर्ज भरण्यासाठीची अंतिम तारीख होती. तर २० मे ही अनामत रक्कम भरण्याची शेवटची तारीख होती. १८ मे पर्यंत अर्ज दाखल केलेल्या १ लाख ५० हजार ५०० अर्जदारांपैकी १ लाख १३ हजार ८३५ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे. बुधवारी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंतचा हा आकडा असून, गुरुवारी यासंदर्भातील अंतिम आकडा सादर केला जाईल, असे म्हाडाच्या वतीने प्रसारमाध्यमांना सांगण्यात आले. (प्रतिनिधी)