Join us

...आता ध्यास रेन वॉटर हार्वेस्टिंगचा

By admin | Published: May 14, 2016 12:45 AM

नागरिकांच्या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या येथील कोकण युवा प्रतिष्ठानने आता पाणीबचतीचे धडे देण्याबरोबरच रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा उभारण्याचा संकल्प केला आहे.

कल्याण : नागरिकांच्या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या येथील कोकण युवा प्रतिष्ठानने आता पाणीबचतीचे धडे देण्याबरोबरच रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा उभारण्याचा संकल्प केला आहे. पाणीटंचाईग्रस्त भागांचे सर्वेक्षण करून ही यंत्रणा उभारली जाणार आहे. यासाठी लागणारा निधी विविध कार्यक्रमांद्वारे संकलित करण्यास सुरुवात झाली आहे.तीन वर्षांपासून विविध सामाजिक विषय प्रतिष्ठानने हाताळले आहेत. कल्याण-डोंबिवली प्रदूषणमुक्तीसाठी घेतलेली महापौर सायक्लोथॉन स्पर्धा, ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरात महिलांसाठी प्रसाधनगृहासाठी स्वाक्षरी मोहीम आदी उपक्रम प्रतिष्ठानने राबवले आहेत. अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे भेडसावणारी भीषण पाणीटंचाई पाहता सध्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दिनेश मोरे ठिकठिकाणी घेत असलेल्या करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात पाणीबचतीचे धडे देत आहेत.आता जलसंधारणासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मोरे यांच्यासह धनंजय चाळके, निखिल माने, प्रथमेश गावडे या पदाधिकाऱ्यांनी हा ध्यास घेतला आहे. लवकरच या अभियानाला मूर्त स्वरूप प्राप्त होणार आहे. यासाठी नुकताच एका नाटकाचा विशेष प्रयोगही घेण्यात आला होता. प्रयोगाचा खर्च वजा करून उरलेला निधी हा अभियानाला वापरला जाणार आहे. पाणीप्रश्नांना आपणही तितकेच जबाबदार आहोत. पण, हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण खारीचा वाटा कसा उचलू शकतो, यासाठी हे अभियान हाती घेतले आहे, असे धनंजय चाळके यांनी सांगितले आहे.