प्रदूषणमुक्तीसाठी आता ‘लखनौ पॅटर्न’; स्वतंत्र हवामान कक्षासाठी चाचपणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 01:05 PM2023-11-02T13:05:47+5:302023-11-02T13:06:25+5:30
लखनौ शहरात वायुप्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी स्वतंत्र वायू नियंत्रण कक्ष आहे.
मुंबई :
लखनौ शहरात वायुप्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी स्वतंत्र वायू नियंत्रण कक्ष आहे. त्याच धर्तीवर मुंबईतही असा एखादा स्वतंत्र कक्ष स्थापन करता येईल का, याची चाचपणी करण्यात येत असल्याची माहिती मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
वातावरण नियंत्रण कक्षामुळे वातावरणाची स्थिती काय आहे, प्रदूषणाची पातळी काय आहे, किती पाऊस पडण्याची शक्यता आहे, पूरस्थिती उद्भवू शकते का, अशा प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील आणि वेळीच आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करता येणार आहे.
मुंबई प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. हवेच्या गुणवत्तेचा दर्जा सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. वाहनांमुळे होणारे प्रदूषण, इमारतींच्या बांधकामांमुळे होणारे प्रदूषण यावर कसे नियंत्रण करता येईल, याचा अभ्यास करण्यात येणार आहे.
विकासकांना अल्टिमेटम
पालिकेकडून विकासक आणि प्रशासकीय प्रकल्प दोघांना प्रदूषण नियंत्रण नियंत्रणासाठीच्या उपायांची अंमलबजावणी बंधनकारक आहे. त्यामुळे मुंबईत सध्या सहा हजार ठिकाणी बांधकामे सुरू असून, येत्या १५ दिवसांत या ठिकाणी स्प्रिंकलर्स आणि ३० दिवसांत स्मॉग गन्ससाठी अल्टिमेटम देण्यात आला आहे.
उपाययोजना
प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यात येणाऱ्या उपकरणांत शहरात १० ठिकाणी व्हर्च्युअल चिमणी बसविण्यात येतील. गर्दीच्या, रहदारीच्या ५० ठिकाणी हवा शुद्ध करणारी यंत्रणा बसविली जातील. यासाठी चेंबूरमधील डायमंड पार्क, भक्ती पार्क, शिवाजी पार्क, राणीची बाग अशा उद्यानांची निवड करण्यात आली आहे. वरील ठिकाणी हवा शुद्धीकरणाचा प्रयोग यशस्वी झाल्यास इतर ठिकाणीही त्याची अंमलबजावणी केली जाईल.