पॅकिंग केलेल्या वस्तूंच्या उत्पादनाचा महिना, वर्ष देणे आता बंधनकारक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 10:07 AM2024-01-04T10:07:40+5:302024-01-04T10:11:38+5:30
एमआरपीसह प्रतियुनिट किंमत छापणे गरजेचे.
मुंबई : पॅकिंग केलेल्या वस्तूंच्या उत्पादकांना, आयातदारांना वेस्टनावर उत्पादनाचा महिना आणि वर्ष घोषित करणे १ जानेवारी २०२४ पासून बंधनकारक करण्यात आले आहे. आतापर्यंत वस्तूंच्या वेस्टनावर उत्पादनाचा किंवा पॅकिंग केल्याचा किंवा वस्तू आयात केल्याचा महिना आणि वर्ष छापण्याचे स्वातंत्र्य होते. त्यामुळे वस्तूच्या पॅकिंगचा किंवा आयात केल्याचा महिना आणि वर्ष वेस्टनावर छापण्यात येत होते. त्यामुळे वस्तू प्रत्यक्ष केव्हा उत्पादित केली आहे किंवा किती जुनी आहे, हे ग्राहकांना कळण्यास मार्ग नव्हता. केंद्र सरकारने हे स्वातंत्र्य संपुष्टात आणून उत्पादक आणि आयातदारांना वेष्टनावर प्रत्यक्ष उत्पादनाचा महिना, वर्ष घोषित करणे बंधनकारक केले आहे.
१९ वस्तू मिळतील कोणत्याही वजनात :
यापूर्वी दूध, चहा, बिस्किटे, खाद्य तेले, पिठे, शीतपेये, पेयजल, डाळी, कडधान्ये, ब्रेड, डिटर्जंट, सिमेंट यांसारख्या १९ वस्तू विशिष्ट वजनातच म्हणजे ५०, ७५, १००, १५० ग्रॅम किंवा ठरावीक किलो किंवा लिटरमध्येच विकणे बंधनकारक होते.
त्यामुळे आतापर्यंत बाजारात दोन, तीन ठरावीक वजनाचेच ब्रेड, टुथपेस्ट, साबण, पेयजलाच्या बाटल्या बघायला मिळायच्या.
आता उत्पादकांवरील हे बंधन काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे आता ब्रेड, टुथपेस्ट, साबण या वस्तू ५०, ६०, ७०, ७५, ८० ग्रॅम अशा कोणत्याही वजनात बाजारात येऊ शकतील. केंद्र सरकारने प्रतियुनिट किंमत छापण्याचे बंधन घालून ग्राहकांचा गोंधळ कमी करण्याचा प्रयत्न केला आहे, असे
ॲड. शिरीष देशपांडे यांनी सांगितले.
विशिष्ट वजनातच वस्तू विकण्याचे बंधन हटवले असल्याची माहिती मुंबई ग्राहक पंचायतचे कार्याध्यक्ष ॲड. शिरीष देशपांडे यांनी ‘लोकमत’ला दिली.
ग्राहकांना वस्तू केव्हा उत्पादित केली, किती नवी, जुनी आहे हे कळू शकेल. तसेच एमआरपीशिवाय पॅकिंगवर प्रतियुनिट किंमत छापणेही बंधनकारक केले आहे.