Join us

बस सेवांच्या मानगुटीवर आता मॅक्सी कॅब?

By admin | Published: July 12, 2016 3:43 AM

सार्वजनिक परिवहन सेवांच्या मानगुुटीवर आता लवकरच ‘मॅक्सी कॅब’चे भूत असणार आहे. सार्वजनिक परिवहन सेवांची अपुरी सेवा, मोठ्या प्रमाणात अन्य वाहनांची वाढलेली

मुंबई : सार्वजनिक परिवहन सेवांच्या मानगुुटीवर आता लवकरच ‘मॅक्सी कॅब’चे भूत असणार आहे. सार्वजनिक परिवहन सेवांची अपुरी सेवा, मोठ्या प्रमाणात अन्य वाहनांची वाढलेली वर्दळ आणि होणारी वाहतूककोंडी यातून सुटका करण्यासाठी एमएमआरटीएने (मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण) १२ आसनी एसी ‘मॅक्सी कॅब’ चालवण्याच्या प्रस्तावाला नुकत्याच झालेल्या बैठकीत मंजुरी दिली. त्यामुळे एमएमआरटीए क्षेत्र असलेल्या भागांत मॅक्सी कॅब धावण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. मॅक्सी कॅब मंजुरीचा अंतिम प्रस्ताव हा शासनाकडे लवकरच पाठवण्यात येणार आहे. मुंबई महानगरात औद्योगिक व व्यापारी क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. परिणामी महानगर क्षेत्रातील वाहन नोंदणीमध्येही वाढ झाली आहे. दररोज साधारण १,२२६ वाहनांची या क्षेत्रात नोंद होते. वाहनसंख्या वाढीचा वेग सरासरी १२ टक्के एवढा आहे. मुंबई महानगर क्षेत्रात रस्त्यावरील वाहनांची गर्दी वाढत असून तुलनेने रस्ते अपुरे पडत आहे आणि त्यामुळे वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते. परिणामी प्रवासास वेळ लागतानाच प्रदूषणातही मोठी वाढ होत आहे.मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवासी वाहतुकीसाठी एसी बेस्ट बस सेवा, ठाणे परिवहन सेवा, नवी मुंबई परिवहन सेवा इत्यादी संस्थांमार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. ही सेवाही अत्यंत अपुरी असून खासगी वाहनांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सक्षम पर्याय उपलब्ध करण्यात यशस्वी झालेली नसल्याचे झालेल्या बैठकीत एमएमआरटीकडून समोर आणण्यात आले. त्यामुळेच एसी मॅक्सी कॅब एमएमआरटीए क्षेत्रात चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. ही कॅब बारा आसनी असेल. ज्या मार्गांवर वातानुकूलित बस चालत नाहीत, अशा मार्गांवर कंत्राटी वाहतूक करणाऱ्या खासगी एसी बसेसना परवानगी देण्यात येणार आहे.