ई-बिलिंग संगणकीय प्रणाली उपलब्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : म्हाडाने सेवाशुल्क भरण्याकरिता ई-बिलिंग संगणकीय प्रणाली कार्यरत केल्याने लाखो नागरिकांना घरबसल्या सेवाशुल्क अदा करता येणार आहे. अभय योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या गाळेधारकांकरिता प्रणालीअंतर्गत सेवाशुल्क भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे, असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
ई-बिलिंग संगणकीय प्रणालीचा शुभारंभ जितेंद्र आव्हाड यांच्या शासकीय निवासस्थानी मंगळवारी करण्यात आला. तेव्हा ते बोलत होते. आव्हाड म्हणाले, २३ वर्षांपासून प्रलंबित प्रश्न तडीस नेऊन सेवा शुल्काच्या रकमेवरील व्याज पूर्णतः माफ केले आहे. सेवाशुल्क अदायगीकरिता ई-बिलिंग संगणकीय प्रणालीची सुरुवात म्हणजे ५६ वसाहतींमधील १ लाख ४६ हजार गाळेधारकांना फायदा होईल. शुल्काच्या वसुलीकरिता एप्रिल - २०२१ पासून अभय योजना राबविण्यात आली.
या अंतर्गत १९९८ ते २०२१ पर्यंतचे संपूर्ण व्याज माफ करून या काळातील मुद्दल पाच वर्षांत दहा हफ्त्यांमध्ये भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. एकरकमी सेवाशुल्क भरू इच्छिणाऱ्या गाळेधारकांना सवलत देण्यात आली. शुल्काचे देयक ई-मेलवर प्राप्त होणार आहे. देयकाबाबत संदेश प्राप्त होणार आहे. देयकाविषयी तक्रारींकरिता ई -बिलिंगच्या संकेतस्थळावर मेलबॉक्स उपलब्ध आहेत.
------------------
ई-बिलिंग प्रणालीचा वापर करण्याकरिता गाळेधारकांना म्हाडाच्या संकेतस्थळावर सिटीझन कॉर्नर या विंडोअंतर्गत सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- योगेश म्हसे, मुख्य अधिकारी, मुंबई मंडळ, म्हाडा.
------------------
ई-बिलिंगचा वापर कसा करावा ?
- म्हाडाच्या mb.mhada.gov.in/billing या संकेतस्थळावर जावे. म्हाडाच्या https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर सिटीझन कॉर्नर या विंडोअंतर्गत सेवा आहे.
- प्रत्येकासाठी एक युनिक कन्झ्युमर क्रमांक तयार करण्यात आला आहे. हा युनिक कन्झ्युमर क्रमांक वापरुन संकेतस्थळावर लॉग इन करावे.
- कन्झ्युमर क्रमांक टाकल्यानंतर पेमेंट करण्यासाठीचे पृष्ठ उघडेल. पृष्ठाच्या उजव्या बाजूला वर देयक डाऊनलोड करण्यासाठीची लिंक आहे. लिंकवर क्लिक करताच देयक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड होईल. त्यावर संपूर्ण माहिती असेल.
- देयक अदा करणाऱ्याचे नाव, देयकाची रक्कम, मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी टाकला की पे बटनावर क्लिक करावे. क्लिक करताच पेमेंट गेटवे ओपन होईल.
- डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, युपीआय, गुगल पे वापरुन देयक अदा करता येईल.
- देयकाची रक्कम खात्यातून वळती झाल्यानंतर गाळेधारकांना त्याची पोच मिळेल.