जयाज्योती पेडणेकर, मुंबईकांदिवली पश्चिमेतील वाडीलाल गोसालिया रोड येथील संजयनगरमधील नवजीवन सेवा सोसायटीत दोन मोबाइल कंपन्यांनी चक्क झोपडपट्टीसदृश चाळीतील घरांवर मोबाइल टॉवर बसवले आहेत. याबाबत स्थानिकांनी पालिकेकडे तक्रार केली आहे. याबाबत आर दक्षिण पालिका विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, ते याविषयी अनभिज्ञ असल्याचे समजले.अनुप एन्टरप्राइज या कंपनीचे नवजीवन चाळीत एक घर आहे. या कंपनीचे मोबाइल टॉवरमध्ये प्रयोग करण्यात येणाऱ्या काही घटकांचा कारखाना आहे. या कंपनीच्या मालकाने चक्क घर भाड्याने देऊन त्यावरच दोन मोबाइल कंपनीचे टॉवर लावले आहेत. स्थानिकांनी विरोध करूनही हे टॉवर बसवण्यात आलेत. टॉवरच्या एन्टिनाची उंची ७ मीटर आहे. तितक्याच उंचीची स्थानिकांची घरे आहेत. भारतीय दूरसंचार नियमन प्राधिकरण नियमावलीनुसार टॉवरचा एन्टिना निवासी क्षेत्रानुसार २५ मीटर दूर असणे आवश्यक असते. झोपटपट्टी विभाग असल्याने एन्टिना लोकांच्या घरांपासून केवळ ४ ते ५ मीटर लांब आहे. टॉवरच्या एन्टिनामधून निघणाऱ्या रेडिएशनचा त्रास स्थानिकांना होत आहे. त्यामुळे सामान्य स्थानिक नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी नवजीवन सोसायटीच्या रहिवाशांनी केली आहे.
आता चाळींवर मोबाइल टॉवर
By admin | Published: November 22, 2014 1:06 AM