मुंबई: देशातील पहिलीवहिली मोनो रेल एमएमआरडीए मार्फत महालक्ष्मी ते चेंबूर धावत असून मोनो रेलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. एमएमआरडीएच्या ताफ्यातील आणखी एक मोनो रेल प्रवाशांच्या सेवेसाठी चालवण्यात येणार आहे त्यामुळे १८ मिनिटांऐवजी मोनो आता दर १५ मिनिटांनी धावणार आहे.
चेंबूर ते महालक्ष्मी (संत गाडगे महाराज चौक) असा मुंबईतीलच नव्हे तर देशातील पहिलावहिला आणि एकमेव मोनोरेल मार्ग आहे. २ फेब्रुवारी २०१४ मध्ये या मार्गातील चेंबूर ते वडाळा हा पहिला टप्पा सुरू झाला. तर दुसरा टप्पा अर्थात चेंबूर ते जेकब सर्कल असा संपूर्ण मार्ग २०१९ सेवेत दाखल झाला. तिकीट हा उत्पन्नाचा मुख्य स्रोत असून प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे मोनोरेलचे उत्पन्न कमी आहे. प्रवाशांची संख्या वाढावी तसेच उत्पन्नात भर पडावी म्हणून मोनोरेलने प्रायोगिक तत्वावर २ ऑक्टोबर पासून त्याच्या वेळापत्रकात बदल केला होता. ८ मोनोरेल गाड्यांपैकी ५ गाड्या पूर्वी चालवण्यात येत असे आता एकूण ६ गाड्या चालवण्यात येत असून फेऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. वेळा पत्रक बदलल्यानंतर आधीच्या ११८ फेऱ्यांमध्ये २४ फेऱ्यांची भर पडली असून मोनोच्या १४२ फेऱ्या होत आहेत त्याला प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.