- नितीन जगतापमुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर २०१९ मध्ये घडलेल्या जीवघेण्या अपघातांपैकी ५० टक्के दुर्घटना वाहनांना पाठीमागून धडक होऊन झाल्या आहेत. यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे पुरेशी विश्रांती न घेणे आणि डाव्या बाजूने ओव्हरटेक करणे हे आहे. यावर उपाय म्हणून आता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ‘टॅक्टटाइल एजलाइन’ तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यामुळे वाहनांना पाठीमागून धडक बसून होणारे अपघात कमी होतील. देशात हा प्रयोग पहिल्यांदाच राबविण्यात येणार आहे.
एमएसआरडीसी, महामार्ग पोलीस, सेव्ह लाइफ फाउंडेशनने या नव्या तंत्रज्ञानासाठी पुढाकार घेतला आहे. याबाबत अधिक माहिती देताना महामार्ग पोलीस अधीक्षक विजय पाटील यांनी सांगितले की, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक जास्त आहे. या मार्गावर तीन मार्गिका असून त्या वाहनांसाठी पुरेशा आहेत. पण अनेक चालक डाव्या बाजूने फोर्थ लेन किंवा पांढऱ्या रंगाची एजलाइन असते त्यावरून गाडी चालवितात. तसेच वाहनांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतात त्या वेळी अपघात घडतो.
काही चालकांना रात्रीच्या वेळी थकवा येतो, त्यांना झोप लागते. चालक रोड सोडून डाव्या बाजूने पांढºया पट्टीवर जातात, त्यामुळे अपघात घडतात. ते रोखण्यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ‘टॅक्टटाइल एजलाइन’ तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर विदेशात होत होता. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेइतके मोठे रोड शोल्डर देशात इतर रस्त्यांवर नाहीत. त्यामुळे भारतात हा प्रयोग पहिल्यांदा राबविण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, वाहनचालकांनीही डाव्या बाजूने ओव्हरटेक करू नये. पांढºया पट्टीचा वापर विशेष प्रसंगातच करावा. एखाद्या वाहनाला अपघात झाला असेल तर त्या ठिकाणी थांबावे. त्याचा लेनप्रमाणे वापर करू नये. थकवा आला असेल तर विश्रांतीसाठी त्याचा वापर करू नये. अवजड वाहनांसाठी खालापूर येथे विशेष व्यवस्था आहे. तेथे विश्रांतीगृह आणि नाश्त्याची व्यवस्था आहे. तर लहान वाहनांना रस्त्यात हॉटेल आणि मॉल आहेत तेथे चालकांना विश्रांती घेता येईल, असेही ते म्हणाले.
‘टॅक्टटाइल एजलाइन’ तंत्रज्ञान म्हणजे काय?डाव्या मार्गिकेच्या पूर्ण शोल्डरवर सहा इंचांच्या अंतराने लहान लहान एक ते दीड फुटांचे रमलर टाकण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी एखादे वाहन गेल्यास वाहनाला धक्का बसेल. जोरात खटखट असा आवाज येईल. त्यामुळे एखाद्या चालकाला झोप लागली तर त्याला जाग येईल. तसेच चालकाला डाव्या बाजूने वाहन चालविणे कठीण होईल. चालक ओव्हरटेक करणार नाही. थकवा आणि ओव्हरटेकमुळे होणारे अपघात कमी होतील. यामुळे वाहनांना पाठीमागून धडक देऊन होणारे अपघात कमी होतील.ओव्हरटेक करणे अशक्यया नव्या प्रणालीमुळे थकवा आणि ओव्हरटेकमुळे होणारे अपघात कमी होतील. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे २०१९ मध्ये जीवघेण्या दुर्घटनांपैकी ५० टक्के दुर्घटना वाहनांना पाठीमागून धडक बसल्यामुळे झाल्या आहेत. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पुरेशी विश्रांती न घेणे आणि डाव्या बाजूने ओव्हरटेक करणे आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ‘टॅक्टटाइल एजलाइन’ तंत्रज्ञानाचा अवलंब केला जाणार आहे. यामुळे चालकाला झोप लागली तरी त्याला जाग येईल आणि डाव्या बाजूने वाहन चालविणे कठीण होईल. ओव्हरटेक करता येणार नाही. साहजिकच या तंत्रज्ञानामुळे थकवा आणि ओव्हरटेकमुळे होणारे अपघात कमी होतील.- पीयूष तिवारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सेव्ह लाइफ फाउंडेशन