Join us

आता मुंबईकर काढणार रोड मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईतल्या रस्त्यांची अवस्था दिवसागणिक अत्यंत वाईट होत आहे. ध्वनी आणि वायू प्रदूषण वाढत चालले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईतल्या रस्त्यांची अवस्था दिवसागणिक अत्यंत वाईट होत आहे. ध्वनी आणि वायू प्रदूषण वाढत चालले आहे. वाहतूक कोंडीच्या समस्यांनी उग्र स्वरूप धारण केले असून वाहतुकीच्या समस्या सुटण्याऐवजी याचा गुंता अधिकच वाढत आहे. या समस्यांची जाणीव सरकारला करून देण्यासाठी मुंबईकर रोड मार्च काढतील.

मुंबईतल्या विविध विषयांवर काम करत असलेले गोपाळ झवेरी यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, मुंबईत पायाभूत सेवासुविधांचा विकास व्हावा, मुंबईकरांना शुद्ध हवा घेता यावी, येथील प्रदूषण कमी व्हावे म्हणून एक चळवळ उभी करत आहोत. या माध्यमातून सरकारला किंवा येथील प्रशासनाला या प्रश्‍नांची जाणीव करून देणे हा यामागचा उद्देश आहे.

मुळात आज मुंबईत विविध ठिकाणी विविध कामे सुरू असली तरी ही कामे पूर्ण होण्यास वेळ लागत आहे. वाहतूक असो व प्रदूषण असो अशा अनेक समस्यांना मुंबईकराला सामोरे जावे लागते. परिणामी ७ मार्च रोजी बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथून काढण्यात येणाऱ्या रोड मार्चमध्ये अधिकाधिक मुंबईकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आम्ही करत आहोत.

मुंबईकरांना चांगल्या सेवा मिळाव्यात. राहणीमान उंचवावे शिवाय भविष्यात मुंबई अधिकच विकसित व्हावी या दृष्टीने हा एक छोटासा प्रयत्न आहे. या मोहिमेमध्ये प्रत्येक मुंबईकर सामील झाला तर निश्चितच आपल्याला मिळणाऱ्या सेवासुविधांमध्ये वाढ होईल, असा दावा गोपाळ झवेरी यांनी केला.

.............................