Join us

आता उच्चभ्रू वस्तीमध्ये पालिकेची तपासणी; पेडर रोड, मलबार हिल नियमित निर्जंतुकीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 4:43 AM

डी विभागांतर्गत येणाऱ्या मलबार हिल, नेपियन्सी रोड, पेडर रोड, ब्रीच कँडी अशा उच्चभ्रू भागातील सोसायट्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्ण आढळून आले.

मुंबई : एकीकडे वरळी, धारावीमधील झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला असताना मलबार हिल, पेडर रोडसारख्या उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्ण सापडत आहेत. याची गंभीर दखल घेऊन महापालिकेमार्फत रुग्ण आढळला की ६० सोसायट्यांमध्ये नियमित तपासणी आणि निर्जंतुकीकरण केले जात आहे.

डी विभागांतर्गत येणाऱ्या मलबार हिल, नेपियन्सी रोड, पेडर रोड, ब्रीच कँडी अशा उच्चभ्रू भागातील सोसायट्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्ण आढळून आले. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर ५ जूनपासून गेल्या २० दिवसांत या विभागात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित सापडू लागले आहेत. उच्चभ्रू वस्तीमध्ये काम करणारे वाहनचालक, हाऊसकिपिंग कामगार, सुरक्षारक्षक यांची संख्या १७० आहे. त्यामुळे अशा उच्चभ्रू वस्त्यांवर पालिका लक्ष ठेवून आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डी विभाग कार्यालयाने कठोर उपाययोजना आखल्या आहेत. त्यानुसार गेल्या दोन दिवसांत ४८ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून रुग्ण आढळलेल्या ६० सोसायट्यांमध्ये लोकांची तपासणी केली जात आहे. तसेच याचा नियमित आढावा प्रत्येक आठवड्यात घेतला जाणार आहे. येथे १८४ इमारती आणि इमारतींचे भाग सील करण्यात आले.रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण ३० दिवसांवर1) ‘डी’ वॉर्डमध्ये एकूण २४४८ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील १५९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ७४३ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्णसंख्या ३० दिवसांनंतर दुप्पट होत आहे. तसेच आठवड्याची सरासरी वाढ २.३ टक्के आहे.2) ग्रँट रोड परिसरात गेल्या आठवड्यात सरासरी ५० रुग्ण सापडत होते. पालिकेच्या कठोर उपाययोजनांमुळे ही संख्या गेल्या दोन दिवसांतच ३५ ते ४० पर्यंत खाली आली, असा दावा अधिकारी करीत आहेत.3) सर्व्हंट टॉयलेटचे दिवसातून चार वेळा निर्जंतुकीकरण, परिसराचे निर्जंतुकीकरण, घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे.4) सील केलेल्या १८४ इमारतींच्या भागांपैकी दोन दिवसांत सुमारे ४० भाग खुले होतील. तसेच १० बाधित क्षेत्रांतील रुग्णांचे प्रमाण आता कमी आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या