Join us

आता पालिकेकडून लहानग्यांची घरोघरी जाऊन तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहानग्यांना धोका असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे. त्या पार्श्वभूमीवर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहानग्यांना धोका असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे. त्या पार्श्वभूमीवर पालिका व राज्य शासनाकडून विविध पातळ्यांवर सज्जतेसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, त्याचाच भाग म्हणून आता मुंबई महानगरपालिकेने १८ वर्षांखालील मुलांची घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या आरोग्य तपासणीसाठी विभागीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. या माध्यमातून तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिलेली मार्गदर्शक तत्त्वांची माहिती पालकांना यावेळी देण्यात येईल, प्रतिबंधक उपाययोजनाही सांगण्यात येणार आहेत.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानांतर्गत कुटुंबीयांची आरोग्यविषयक माहिती पालिकेकडून गोळा करण्यात येत आहे. तसेच तिसऱ्या लाटेच्या प्रतिबंधासाठी पालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

लहानग्यांना संसर्ग होऊ नये किंवा झाल्यास वेळेत उपचार मिळावेत, यासाठी पालिका खबरदारी घेऊन उपाययोजना करत आहे. तिसऱ्या लाटेच्या दृष्टिकोनातून सर्व बाजूंनी नियंत्रणाविषयीचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या आठवड्यात रुग्णालय अधिष्ठाता, डॉक्टर्स, बालरोगतज्ज्ञ आणि अन्य शाखेतील वैद्यकीय तज्ज्ञांची बैठक पार पडली. त्यामुळे पालिकेकडून आता याविषयी जनजागृतीही करण्यात येत आहे.

* महत्त्वाची माहिती संकलन

घरोघरी जाऊन करण्यात येणाऱ्या आरोग्य तपासणीच्या माध्यमातून लहानग्यांना असणाऱ्या सहव्याधींविषयीची माहिती जमा कऱण्यात येईल. यामुळे पालिकेकडे तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा डेटा संकलित होईल, जेणेकरुन पुढील तिसऱ्या लाटेत उपचार व प्रतिबंधाच्या दृष्टीने याची मदत होईल आणि लहानग्या रुग्णांना लवकरात लवकर उपचार मिळणे सुकर होईल.

- डॉ. रमेश भारमल,

नायर रुग्णालय, अधिष्ठाता

------------------------------------------