आता पालिकेला चिंता मुंबईत येणाऱ्या परदेशी पर्यटकांची!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 10:08 AM2021-11-16T10:08:38+5:302021-11-16T10:09:23+5:30
३१ डिसेंबरपर्यंत यंत्रणा राहणार सतर्क; लसीकरणामुळे साथ नियंत्रणात
मलोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गणेशोत्सवपाठोपाठ दिवाळी सण साजरा झाल्यानंतरही मुंबईत गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ दिसून आलेली नाही. मात्र नववर्षाच्या जल्लोषासाठी परदेशातून येणाऱ्या पाहुण्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे गाफील राहिल्यास अन्य देशातील विषाणूचा संसर्ग मुंबईत शिरकाव करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच फेब्रुवारी-मार्च महिन्यात तिसरी लाट येण्याचे संकेत आहेत. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत महापालिका यंत्रणा सतर्क ठेवण्यात येणार आहे.
कोरोनाची दुसरी लाट मुंबईत आता पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. सध्या दररोजची रुग्णसंख्या दोनशे - अडीचशे असून दोन हजार ८२३ सक्रिय रुग्ण आहेत. तसेच रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.०३ टक्के एवढा आहे. कोविड मृत्यूचे प्रमाणही एक टक्क्यांहून कमी आहे. गणेशोत्सवानंतर सप्टेंबर महिन्यात बाधित रुग्णांची संख्या वाढेल, असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र लसीकरणाच्या प्रभावामुळे कोरोनाचा प्रसार आटोक्यात असल्याचे आढळून आले आहे. दिवाळीमध्ये बाजारपेठेत खरेदीसाठी लोकांची गर्दी झाली होती. या काळात लोकांच्या भेटीगाठीही वाढल्या. परंतु, अद्याप रुग्णसंख्येत वाढ दिसून आलेली नाही.
दिवाळीतील भेटीगाठींच्या परिणामाकडे लक्ष
गेल्या वर्षी कोरोनाकाळात दिवाळी अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली होती. मात्र यावर्षी कोरोना नियंत्रणात असल्याने दिवाळीत मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात आली. या काळात बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी सण साजरा करण्यात आला. त्यानंतरचा १४ दिवसांचा कालावधी २० नोव्हेंबर रोजी पूर्ण होत आहे. तोपर्यंत रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती कायम आहे. त्यामुळे मुंबई शहरातील कोरोना परिस्थितीचा पालिका प्रशासन आढावा घेत आहे.