मुंबई : वाढणारी प्रवासी संख्या आणि त्यामुळे वाढणाऱ्या सेवासुविधा लक्षात घेता रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी उपनगरीय लोकल प्रवाशांसाठी एमयूटीपी-४ची घोषणा केली. यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांना योजना आखण्यास सांगण्यात आल्याची माहिती प्रभू यांनी दिली. सोमवारी रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते दादर स्थानकात आयएसएस (इंटीग्रेटेड सिक्युरिटी सिस्टम) यंत्रणा, ठाणे स्थानकासाठी दुमजली पार्किंग, दिवा आणि विठ्ठलवाडी स्थानकात पादचारी पुलाच्या सुविधांचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. उपनगरीय लोकल सेवा ही खऱ्या अर्थाने जीवनरेखा आहे. त्याचे नेटवर्क वाढवण्याची रेल्वे प्रशासनासमोर अडचण आहे. तरीही त्यावर मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सुरेश प्रभू यांनी सांगितले. मात्र प्रवाशांची सुरक्षा आणि त्यांच्या सुखसोयी पाहता रेल्वे प्रशासनाकडून दादर, ठाणे, दिवा आणि विठ्ठलवाडी स्थानकात सुविधा दिल्या जात असल्याचे ते म्हणाले. महत्त्वाची बाब म्हणजे एमआरव्हीसीच्या (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) एमयूटीपी-३मधील तीन प्रकल्पांचा रविवारी शुभारंभ करण्यात आला. यातील प्रकल्पांवर लवकरच काम सुरू होऊन ते मार्गी लागतील. मात्र प्रवाशांची दिवसेंदिवस वाढत जाणारी संख्या तसेच भविष्यात आणखी लागणाऱ्या सुविधा पाहता एमयूटीपी-४चीही घोषणा केली जावी आणि यात अनेक नवीन प्रकल्पांचा समावेश केला जावा, अशी मागणी खासदारांकडून केली जात आहे. हे पाहता एमयूटीपी-४ची आवश्यकता असून, रेल्वे अधिकाऱ्यांना त्याची योजना आखण्यास सांगण्यात आल्याचे प्रभू यांनी या वेळी सांगितले. याबाबत लवकरच बैठकही घेण्यात येईल, अशी माहिती प्रभू यांनी दिली. याबाबत एमआरव्हीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांना विचारले असता, रेल्वेमंत्र्यांनी एमयूटीपी-४विषयी योजना आखण्यास सांगितले आहे. यात भविष्यात प्रवाशांना कोणत्या सुविधांची गरज लागेल हे पाहून आणि राज्य सरकारशी बोलणी करूनच निर्णय घेतला जाईल. सध्या एमयूटीपी-४मध्ये कोणते प्रकल्प असतील, हे सांगणे कठीण असल्याचे ते म्हणाले. त्यासाठी योजना बनविली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. एमयूटीपी-२मधील रेल्वेचे चार प्रकल्प अद्यापही सुरू आहेत. त्यातच नुकत्याच झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पात एमयूटीपी-३मधील काही रेल्वे प्रकल्पांची घोषणा करण्यात आली. यात ऐरोली-कळवा लिंक रोड, स्थानकांचा विकास, विरार-डहाणू, पनवेल-कर्जत नवी उपनगरीय मार्गिका यांचा समावेश आहे. विठ्ठलवाडीचे नाव प्रभू विसरले : विठ्ठलवाडी स्थानकात नव्या पादचारी पुलाचेही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी आपल्या भाषणात ‘ठळकवाडी’ स्थानकात पादचारी पूल उभारण्यात आला असल्याचे सांगताच उपस्थित रेल्वे अधिकारी आणि खासदारांनी ठळकवाडी नाही, तर विठ्ठलवाडी स्थानक अशी आठवण करून दिली. आपली चूक सुधारत प्रभू यांनी विठ्ठलवाडी स्थानकाचे नाव घेतल्यावर हशा पिकला.मुंबई शहर आणि उपनगरातील सर्व स्थानकांचा विकास करण्यासाठी पीपीपी मॉडेल (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) राबविण्यात येणार आहे. यासाठी केंद्राकडे बोलणी सुरू असल्याचे प्रभू यांनी सांगितले. एखादी मोकळी रेल्वेची जागा असल्यास तेथे पीपीपीद्वारे इमारत उभारून प्रवाशांसाठी सुविधा दिल्या जातील.
आता एमयूटीपी-४!
By admin | Published: June 30, 2015 3:28 AM