Join us

आता नवी मुंबई ते मुंब्रा प्रवास होणार जलद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2019 3:17 AM

डिसेंबर, २०२० पर्यंत होणार भुयारी रस्ता तयार

- योगेश जंगम मुंबई : ठाणे-बेलापूर ते राष्ट्रीय महामार्ग-४, अर्थात मुंब्रा बायपास रस्ता जोडण्यासाठी पारसिक डोंगरातून बोगदा खोदून नवीन रस्ता तयार करण्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) सुरू करण्यात आले आहे. १.८ किमीच्या या बोगद्यापैकी आत्तापर्यंत १०० मीटरचे काम पूर्ण करण्यात आले आहे. काम वेगाने सुरू असून या बोगद्यामुळे नवी मुंबई ते मुंब्रा या प्रवासात शीळफाटा ते महापे रोडचा वळसा टळणार असल्याने प्रवाशांना कमी वेळेत प्रवास करता येणार आहे. यामुळे प्रवाशांची अर्ध्या तासाची बचत होणार आहे.

या भुयारी रस्त्याचा जास्त फायदा कल्याण आणि नवी मुंबई परिसरातील रहिवाशांना होणार आहे. सध्या कल्याण ते ऐरोलीत पोहोचण्यासाठी १ तास १५ मिनिटे लागतात. भुयारीकरण झाल्यावर अवघ्या पाऊण तासात हे अंतर पार करता येणार आहे. यामुळे नवी मुंबईतून प्रवासी थेट रबाळे येथे मुंब्रा बायपासला पोहोचू शकणार आहेत.

नवी मुंबईतील रबाळे, ऐरोली येथून कल्याण-डोंबिवलीच्या दिशेने प्रवास करताना प्रवाशांना शीळफाटा-महापे रस्त्याचे वळण घेऊन प्रवास करावा लागतो. तसेच बेलापूर-ठाणे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना कळवा परिसरातील रेल्वे उड्डाणपूल आणि कळव्यातील खाडी पुलावरील कोंडीचा सामना करावा लागतो. हे अडथळे दूर करण्यासाठी ठाणे-बेलापूर रस्त्यावरून प्रवास करणाºया वाहनांना थेट मुंब्रा बायपास महामार्गावर येण्यासाठी पारसिक बोगदा खोदून एमएमआरडीएमार्फत जोडरस्ता तयार करण्यात येत आहे.

पारसिक डोंगरातून बोगदा खोदून नवीन रस्ता तयार करण्याच्या कामाला आता सुरुवात करण्यात आली आहे. १.८ किमी अंतराच्या या बोगद्याच्या कामापैकी आत्तापर्यंत १०० मीटरचे काम पूर्ण झाले आहे. तसेच डिसेंबर २०२० पर्यंत भुयारी रस्त्याचे काम पूर्ण होणार असल्याचे एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त संजय खंदारे यांनी सांगितले.

ऐरोली ते कटई नाकादरम्यान उन्नत मार्गिका

मुंबईतून बदलापूरदरम्यान प्रवास करणाऱ्यांचाही प्रवास सुसह्य होणार आहे. २०२१ सालापासून मुंबईहून बदलापूरदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा तब्बल एक तास वाचणार आहे. सध्या मुंबई ते बदलापूरदरम्यान रस्त्यावरून प्रवास करताना तब्बल दोन तास लागतात. लवकरच हा प्रवास १ तास १३ मिनिटांमध्ये होणार आहे. मुंबई आणि बदलापूरचे अंतर कमी करण्यासाठी एमएमआरडीए उन्नत मार्ग (एलिवेटेड) तयार करीत आहे.

ऐरोली ते कटाई नाका (कल्याणजवळ)दरम्यान उन्नत मार्गिका बांधण्यात येत आहे. खंदारे यांनी सांगितले, या उन्नत मार्गाचे ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. २०२१ सालापर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. उन्नत मार्गाला राष्ट्रीय महामार्ग-४ ला जोडण्यासाठी मुंब्रा बायपास येथे भुयारी रस्ता बनविण्यात येत आहे.

टॅग्स :मुंब्रानवी मुंबई