मुंबई : अतिक्रमणांच्या विळख्यात असलेल्या मिठी नदीतून जलवाहतूक सुरू करण्याचे स्वप्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखविले. केंद्र शासनाने ‘नॅशनल इनलँड वॉटरवेज’ ही योजना सुरु केली असून या योजनेत मिठी नदीचा समावेश करण्यात यावा, असा प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले.मिठी नदी रुंदीकरण प्रकल्पासाठी स्थापन केलेल्या मिठी नदी विकास प्राधिकरणाबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य सुनील प्रभू, मल्लिकार्जून रेड्डी, अॅड. आशिष शेलार, भास्कर जाधव, अस्लम शेख, योगेश सागर यांनी विधानसभेत विचारला होता.मिठीमध्ये जलवाहतूक सुरू करण्यासंबंधीचा आराखडा तयार केला जाईल. केंद्रीय योजनेत त्याचा समावेश करण्यासाठी भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करू, असे मुख्यमंत्री म्हणाले. मिठी रुंदीकरण प्रकल्पासाठी स्थापन केलेल्या प्राधिकरणाच्या धर्तीवरच दहिसर, पोईसर आणि ओशिवरा या नद्यांसाठी संयुक्त प्राधिकरण स्थापन करण्याबाबत अभ्यास केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)
आता ‘मिठी’तून जलवाहतूक
By admin | Published: March 30, 2016 12:33 AM