मुंबई- राज्यात स्थापन झालेल्या शिंदे सरकारकडून मागच्या कामांना स्थगिती देण्याचा धडाका लावला आहे. मात्र असं करण्याचं काहीच कारण नव्हतं. वास्तविक ही प्रक्रिया आहे. सरकार येत असतात आणि जात असतात. आता हे दोघे आलेत ते ताम्रपट घेऊन आलेत काय? हेही कधीतरी जाणारच आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. आज अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर निशाणा साधला.
शिंदे सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या कामांना शिंदे सरकारकडून स्थगिती देण्यात येत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस उच्च न्यायालयात देखील धाव घेत याचिका दाखल करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या भूमिकेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
२०२१ पर्यंतची कामं बंद करणं योग्य नाही. विकासाची कामं होती. महाराष्ट्रातील कामं होती, कुणाच्या घरादारातील कामं नव्हती. छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू य़ेथील नियोजित स्मारकाचा निधीही स्थगितीमुळे रखडलाय. राजर्षी शाहू महाजारांचा निधीही अडकलाय. मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय असं खालच्या पातळीवरचं राजकारण महाराष्ट्रात झालं नव्हत. हे तातडीने थांबवा, असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे.
२५ जुलै उजाडल्यानंतरही पावसाळी अधिवेशन अद्याप झालं नसल्याची टीकाही अजित पवारांनी केली. अधिवेशन तारखा सातत्यानं पुढे जात आहे. हे सरकार जर बहुमत आहे तर मग अधिवेशन का घेत नाही. विधीमंडळात आमदारांना आपले प्रश्न मांडता येतात परंतु जाणीवपूर्वक अजूनही मंत्रिमंडळ विस्तार आणि अधिवेशन घेतलं जात नाही. मुख्यमंत्री दिल्लीला जातात, पण जनतेचं काय?, असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला.