मुंबई : सध्या असलेल्या नैसर्गिक साधनसामुग्रीचे संवर्धन करून कृषी क्षेत्रातील उत्पादन क्षमता वाढवून, देशाची अन्नाची गरज भागवायला देशाला दुसऱ्या हरितक्रांतीची गरज आहे. ही दुसरी हरितक्रांती सदा हरितक्रांती करण्याची आवश्यकता असल्याचे मत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी व्यक्त केले. ८व्या इंडियन युथ सायन्स काँग्रेसची शुक्रवारी सांगता झाली, या वेळी कुलगुरू बोलत होते. या तीनदिवसीय परिषदेत देशभरातील दीड हजाराहून अधिक तरुण संशोधक सहभागी झाले होते. भित्तिपत्रक स्पर्धा आणि मौखिक सादरीकरणातून अनेक तरुण संशोधकांनी आणि नवउद्योजकांनी मूलभूत विज्ञान व विज्ञान आणि तंत्रज्ञान या अशा अनेक विषयांवर सादरीकरण केले. गेल्या काही महिन्यांपूर्वी महागाई वाढली होती. सर्वसामान्य माणसांना अन्नाधान्याच्या वाढत्या किमतीने बेजार केले होते. सर्वांना सकस आणि पोषक आहारासाठी झगडावे लागत आहे. कुपोषणाचा प्रश्न गरीब वस्ती, पाड्यांसह मोठ्या शहरातही भेडसावत आहे, ही खेदाची बाब आहे. वातावरणातील बदलाचाही दुष्परिणाम कृषिक्षेत्रावर जाणवत असून, त्यामुळेही शेतीउद्योग संकटात सापडला आहे. या सगळ््या प्रश्नांवर मात करण्यासाठी हरितक्रांतीचा पर्याय आहे, पण आता होणारी क्रांती ही सदाहरित असणे गरजेचे असल्याचे विशेषत: नमूद करण्यात आले. शेती उद्योगात आणि कृषिक्षेत्राकडे तरुण पिढीला आकर्षित करून, त्यांना या उद्योगातील दुसरी पिढी म्हणून काम करण्याची प्रेरणा देण्याचीही गरज असल्याचे या परिषदेत तज्ज्ञांचे म्हणणे होते. राष्ट्रीय शेतकरी आयोगाला सादर करण्यात आलेल्या अहवालामध्ये सदा हरितक्रांतीचे नमूद करण्यात आले. या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचीही गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तीनदिवसीय या युवा विज्ञान परिषदेच्या आजच्या समारोप समारंभामध्ये वातावरण बदलाच्या अनुषंगाने अन्नसुरक्षा या विषयाशी निगडित जेनेटिक रिसॉर्सेस अँड क्लायमेट चेंज, अर्ली वार्निंग सिग्नल्स (ट्रॅडिशनल अँड मॉडर्न अप्रोच) अँड क्लायमेट चेंज, कार्बन सिंक्स, नॅचरल रिसॉर्सेस मॅनेजमेंट अँड ट्रॅडिशनल विस्डम या विषयांवरील जवळपास ३१० प्रकल्प सादर करण्यात आले होते, तर याच विषयावर ६ संशोधकांनी मौखिक सादरीकरण केल होते. आजच्या या कार्यक्रमात स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशचे डॉ. सेल्वम, डॉ. राजलक्ष्मी, राजीव गांधी इन्स्टिट्यूट आॅफ युथ डेव्हलपमेंटचे मनीवासनम, डॉ. परशुराम, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम.ए. खान आणि बीसीयूडी संचालक डॉ. अनिल पाटील यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राचार्य आणि संचालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)नवीन वैज्ञानिकांची हजेरी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये भरलेल्या ८व्या इंडियन युथ सायन्स काँग्रेसचा शनिवारी समारोप झाला. या वेळी तरुण वयात पहिला थ्री-डी प्रिंटर बनवून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती घडवली, तो करण चाफेकर आणि प्रथम सॅटेलाइटची यशस्वी चाचणी करून, पहिले भारतीय विद्यार्थ्यांचे उपग्रह म्हणून ओळख मिळवून देणारा आयआयटी बॉम्बे येथील विद्यार्थी आदित्य सिंघल आणि त्याचा चमू उपस्थित होता. यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रवास, आलेले अडथळे आणि या सगळ््यावर मात करून यश संपादन करण्यासाठी केलेले प्रयत्न याची सविस्तर माहिती दिली.शेती क्षेत्रासमोरील आव्हाने देशाच्या अन्नसुरक्षेला आर्थिक, पर्यावरणीय आणि समाजातील विविध घटकांपासून धोका जाणवत असून, बाह्य दक्षता बाळगून देशाच्या अन्नसुरक्षेची काळजी घेणे गरजेचे आहे. देशाचे शेतीक्षेत्र अनेक संकटातून जात असून, त्यामध्ये शेतीयोग्य क्षेत्र, शेतीक्षेत्राकडे तरुण पिढीची उदासिनता, सार्वजनिक धोरणाची असहायता, सार्वजनिक वितरण प्रणाली अशा विविध संकटाने कृषिक्षेत्राला ग्रासले असून, त्यावर वेळीच तोडगा काढणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
आता ‘सदा हरितक्रांती’ची गरज
By admin | Published: February 19, 2017 1:39 AM