आता पीएच.डी.साठी यूजीसीची नवी कार्यपद्धती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 07:00 AM2019-02-06T07:00:48+5:302019-02-06T07:00:57+5:30
यंदा विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या आॅनलाइन पीएच.डी. परीक्षेसाठी तब्ब्ल ६,१६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
मुंबई : यंदा विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या आॅनलाइन पीएच.डी. परीक्षेसाठी तब्ब्ल ६,१६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातच आता १६ डिसेंबर २०१८ च्या यूजीसीच्या परिपत्रकाप्रमाणे ७० टक्के लेखी परीक्षेतील गुण आणि ३० टक्के तोंडी परीक्षेतील गुण यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने पीएच.डीसाठी विद्यार्थ्यांची पात्रता ठरविण्याचे
पत्रक जारी केले आहे. यामुळे
५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना
याचा फायदा होईल.
यापूर्वी पीएच.डी. परीक्षेच्या पद्धतीप्रमाणे लेखी परीक्षेत ५० टक्के गुण मिळविलेले विद्यार्थीच पीएच.डीच्या पुढील स्तरासाठी म्हणजेच तोंडी परीक्षेसाठी पात्र ठरत होते. मात्र १६ डिसेंबरच्या यूजीसीच्या परिपत्रकाप्रमाणे ७० टक्के लेखी परीक्षेतील गुण आणि ३० टक्के तोंडी परीक्षेतील गुण लक्षात घेऊन पीएच.डीसाठी विद्यार्थ्यांची पात्रता ठरविली जावी असे निश्चित केले आहे. मात्र मुंबाई विद्यापीठाकडून जारी केलेल्या परिपत्रकात अशा प्रकारच्या सूचना नमूद केल्या नव्हत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता.
विद्यार्थी हित लक्षात घेता परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना यूजीसीच्या नवीन परिपत्रकाप्रमाणे पात्र ठरवत दिलासा द्यावा, अशा मागणीचे पत्र मनविसेने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना दिले होते. मुंबई विद्यापीठाने अद्याप पीएच.डीसाठी निकाल जाहीर केला नसल्याने यूजीसीच्या नव्या नियमांचा अवलंब करावा, अशी मागणी मनविसेचे राज्य उपाध्यक्ष संतोष गांगुर्डे यांनी केली होती. अखेर विद्यार्थी हित लक्षात घेता यूजीसीच्या नियमांचे पालन करणे क्रमप्राप्त असल्याचे सांगत मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन संचालक मंडळाचे नवीन संचालक विनोद पाटील यांनी परिपत्रक जारी केले.