मुंबई - पूर्वी नवीन रेशन कार्ड काढणे खूप कटकटीचे काम असायचे. त्यासाठी वारंवार रेशनिंग कार्यालयात खेटे मारावे लागायचे. पण, आता तो त्रास संपला असून, ऑनलाइनच्या माध्यमातून इच्छुकांना आता घरबसल्या रेशन कार्ड काढता येते. पण, अंधेरी व कांदिवली या दोन परिमंडळातं गेल्या तीन महिन्यांत एकही ऑनलाइन अर्ज आलेला नसून, लाभार्थ्यांमध्ये निरुत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. हे संकेतस्थळही मागील दोन महिने बंद असल्याची माहितीही समोर येत आहे.
रेशन कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी एक महत्त्वाचे दस्तऐवज झाले आहे. त्याचा उपयोग विविध योजनांचा लाभ घेताना होतो. मुळात सर्वांना स्वस्तात पोषक अन्नधान्य मिळावे, यासाठी शासनाकडून रेशन कार्ड अर्थात शिधापत्रिका उपलब्ध करून दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतो.
कोणत्या संकेतस्थळावर जावे लागते?घरबसल्या नवीन रेशनकार्ड काढण्यासाठी सर्वात अगोदर अधिकृत संकेतस्थळावर जाऊन प्रक्रिया पार पाडावी. आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. तुम्ही भरलेली माहिती योग्य असेल, तर पात्रता सिद्ध होते आणि नवे रेशन कार्ड मिळते.पात्रता सिद्ध झाल्यास कार्यालयात न जाता अर्जदारांच्या पत्त्यावर नवीन रेशन कार्ड येते.
कागदपत्रे कोणती लागतात? नवे रेशन कार्ड काढण्यासाठी इच्छुकांना ओळखीचा पुरावा म्हणून पॅन कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट, रहिवासी पुरावा म्हणून वीजबिल, टेलिफोन बिल, व्होटर आयटी, पासपोर्ट, तसेच कुटुंबाच्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र, स्वघोषणापत्र, चौकशी अहवाल ही कागदपत्रे सादर करावी लागतात.
पश्चिम उपनगरातील अंधेरी व कांदिवली या दोन परिमंडळांत गेल्या तीन महिन्यांत एकही ऑनलाइन अर्जच आलेला नाही. त्यामुळे योजना सुरू असली, तरी नागरिकांचा निरुत्साह दिसतो आहे. त्यामुळे ऑनलाइन प्रणालीचा उपयोग करून इच्छुकांनी नवीन रेशन कार्ड काढावे.- शिधावाटप अधिकारी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामकाजात ऑनलाइन प्रणालीचा वापर करा, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा विभागाने ही प्रणाली गतिमान कशी होईल, यासाठी प्रचार व प्रसार करून ग्राहकांचे प्रबोधन हाती घ्यायला हवे. - उदय चितळे, गोरेगाव प्रवासी संघ