Join us  

आता ‘रुग्ण कल्याण’ नव्हे, तर जन आरोग्य समिती, लोकसहभागाला प्रोत्साहन देणारी समिती कात टाकणार

By स्नेहा मोरे | Published: November 25, 2022 8:30 AM

Health: आरोग्यसेवा क्षेत्रात सक्रिय लोकसहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक पातळीवर असलेल्या रुग्ण कल्याण समितीची यंत्रणा आता कात टाकणार आहे.

- स्नेहा मोरेमुंबई : आरोग्यसेवा क्षेत्रात सक्रिय लोकसहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक पातळीवर असलेल्या रुग्ण कल्याण समितीची यंत्रणा आता कात टाकणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने बुधवारी जाहीर केलेल्या निर्णयानुसार, आता ही समिती रुग्ण कल्याण समिती नव्हे, तर जनकल्याण समिती म्हणून कार्यान्वित होणार आहे.रुग्ण कल्याण समिती ही नोंदणीकृत संस्था असून, पंचायत राज संस्था प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, प्रतिष्ठित व्यक्ती आणि आरोग्यासह शासकीय क्षेत्रातील अधिकारी अशा व्यक्तींचा यात समावेश आहे. आरोग्य विभागाच्या नव्या निर्णयानुसार आता या समितीच्या रचनेत व कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात येणार आहे. जन आरोग्य समिती ही जिल्हा आरोग्य सोसायटीचा एक घटक म्हणून काम करणार असून, त्यासाठी स्वतंत्र धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणीची आवश्यकता नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आरोग्य वर्धिनी उपकेंद्राकरिता ५० हजार रुपये, तर प्राथमिक आरोग्य केंद्रास १ लाख ७५ हजार रुपये निधीची तरतूद करण्यात येते. हा निधी समितीच्या पातळीवर घेतलेल्या निर्णयांच्या आधारे वापरण्याचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत.

हे असेल समितीचे कार्य    सामाजिक-पर्यावरणीय बहुक्षेत्रीय कार्यक्रमांचे नियोजन    क्षेत्रीय पातळीवर वार्षिक आरोग्य दिनदर्शिका दिवस साजरा करणे    विविध आजारांच्या सनियंत्रणासाठी नियोजित राष्ट्रीय कार्यक्रमाची अंमलबाजवणी सामुदायिक पातळीवर करणे    ग्राम आरोग्य पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समिती सदस्यांना सहकार्य करणे

समितीची जबाबदारी    आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये सेवा-सुविधा परिपूर्ण होण्यासाठी नियमित आढावा घेणे    आरोग्यवर्धिनी केंद्र स्तरावर गरीब, असुरक्षित घटकांना आऱोग्य सेवा नाकारली जात नाही याची खात्री करणे    आरोग्यवर्धिनी केंद्रांत शुल्क आकारले जाणार नाही यावर देखरेख करणे    आरोग्यवर्धिनी केंद्रस्तरावर अत्यावश्यक औषधांची यादी, निदानात्मक यादी याप्रमाणे उपचार मिळतील यावर लक्ष ठेवणे    दर्जेदार आरोग्य सेवांची तरतूद करण्यासाठी आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्रांना साहाय्य करणे

टॅग्स :आरोग्यमुंबई