आता उन्हाळी सुट्ट्यांवर नोटासंक्रांत
By admin | Published: April 11, 2017 02:49 AM2017-04-11T02:49:33+5:302017-04-11T02:49:33+5:30
ऐन दिवाळीच्या सुट्टीत नोटाबंदीची घोषणा करून देशातील भ्रष्टाचार आणि काळ््या पैशांचे निर्दालन करण्यासाठी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे जवळपास
ठाणे : ऐन दिवाळीच्या सुट्टीत नोटाबंदीची घोषणा करून देशातील भ्रष्टाचार आणि काळ््या पैशांचे निर्दालन करण्यासाठी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे जवळपास तीन महिन्यांहून अधिक काळ देशवासीयांना एटीएमच्या रांगेत उभे करणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारच्या निर्णयांचा फटका आता उन्हाळी सुट्ट्यांनाही बसू लागला आाहे. या सुट्या सुरू होताच पुन्हा सर्वत्र नोटाटंचाई भेडसावू लागली असून सर्वत्र एटीएमसाठी रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. अनेक बँकांनी मागील वेळेप्रमाणे नोटा नसल्याचे जाहीर करत एटीएम मशीन बंद करून तसे फलक बाहेर लावल्याने ग्राहक हवालदिल झाले आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि किरकोळ विक्रेत्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे.
आठवडाभर ही नोटाटंचाई जाणवत असून बँकांनी सुरूवातीला सॉफ्टवेअरमधील बिघाडाचे, नंतर नेटवर्क डाऊन असल्याचे कारण देत वेळ मारून नेली. मात्र गेल्या दोन दिवसांत नोटाटंचाईची स्थिती पुन्हा उद््भवल्याचे स्पष्ट झाले आणि ठिकठिकाणी नोटांच्या शोधात फिरणारे नागरिक दिसू लागले. राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, सहकारी बँका, शेड्युल्ड बँका अशा सर्व ठिकाणी ही स्थिती पाहायला मिळते आहे. मात्र अवघ्या दोन महिन्यात ही स्थिती पुन्हा का उद््भवली याचे कारण कोणत्याही बँकेतून समजू शकलेले नाही. त्याचबरोबर ही स्थिती किती दिवसात पूर्ववत होईल आणि सहजपणे नोटा मिळू लागतील, याचेही उत्तर कोणत्याच अधिकाऱ्याकडून मिळत नसल्याने हवालदिल झालेले, त्रासलेले ग्राहक सर्वत्र पाहायला मिळत आहेत. (प्रतिनिधी)
कॅशलेसच्या आग्रहासाठी
नोटाबंदीच्या काळात सुरूवातीच्या तीन महिन्यात जेवढ्या प्रमाणात व्यवहार कॅशलेस झाले होते, ते प्रमाण नंतरच्या दोन महिन्यात कायम राहिले नाही.
त्यामुळे नागरिकांना पुन्हा कॅशलेसकडे वळवण्यासाठी नोटांचा पुरवठा केंद्र सरकारच्या सूचनेनुसार रिझर्व्ह बँकेने कमी केल्याची चर्चा बँकिंग वर्तुळात आहे.
पुन्हा नोटाटंचाई सुरू झाली, तर इंटरनेट, डेबिट-क्रेडिट कार्ड, वेगवेगळ््या अॅपद्वारे व्यवहार वाढतील असा अंदाज आहे. त्यामुळे ही परिस्थिती उद््भवल्याचे सांगितले जाते.
बँकांचे निर्बंध जबाबदार
अनेक बँकांनी तीन किंवा पाच व्यवहार केल्यावर त्यावर कर लावण्याचे जाहीर केले. ग्राहकांनी सतत बँकेत येऊ नये, यासाठी ही कल्पना लढवली असली तरी त्यामुळे एक किंवा दोनच व्यवहारांत महिनाभराच्या खर्चाची किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम काढण्यास सुरूवात झाली. त्यामुळेही रोख रक्कम कमी झाल्याचा दावा केला जात आहे.
परराज्यातून नोटा
अनेक बँकांच्या दिल्ली, पंजाब, हरियाणा आधी ठिकाणच्या शाखांत शिल्लक नोटांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे ठाणे, डोंबिवलीतील बँकांनी आपले खास कर्मचारी नियुक्त करून तेथून पेट्या भरून रोख रकमा आणण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी रकमांचे हिशेब, त्या वाहून आणणे, त्यासाठीची सुरक्षा, कस्टमची तपासणी यांचा विचार करता एकावेळी किमान तीन हजार रूपयांचा खर्च येतो, असे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र आपल्या बँकांतील ग्राहक तुटू नयेत यासाठी ही धावपळ सुरू असल्याचे त्यांनी मान्य केले.
निर्बंध उठवल्याचा फटका
दर आठवड्याला बँंकातून किती रक्कम काढावी यावरील निर्बंध उठवल्यानंतर मोठ्या ग्राहकांनी भरभरून रकमा काढल्या. मात्र त्या प्रमाणात रोख रकमेचा पुरठा नव्हता. त्यामुळे बँकांचे नियोजन कोलमडले असेही बँक अधिकारी सांगत आहेत.
नोटांची छपाईच कमी
आधी रद्द केलेल्या पाचशे आणि हजारांच्या नोटा ज्या प्रमाणात होत्या, त्यापेक्षा नव्या नोटांची छपाई रिझर्व्ह बँकेने कमी प्रमाणात केली. सुरूवातीला कॅशलेसवर भर देण्याच्या काळात आणि मर्यादित रक्कम काढण्याच्या काळात ही चणचण जाणवली नव्हती. आताच्या निर्बंध कमी केल्याच्या काळात ती तीव्रतेने जाणवू लागल्याचा युक्तीवाद केला जात आहे.
पुन्हा एटीएमसमोर तासनतास
नोटा मिळत नसल्याने विविध बँकांच्या एटीएम मशीनसमोर पुन्हा रांगा दिसू लागल्या आहेत. त्याचवेळी पुरेशी रोख रक्कम नसल्याने अनेक बँकांच्या एटीएमवर तसे फलक झळकू लागले आहेत. रोख रकमेची ही चणचण ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर अशा शहरांप्रमाणेच मुरबाड-शहापूरसारख्या निमशहरी भागांतही जाणवू लागली आहे.
ज्येष्ठांना मोठा फटका
गेल्या महिन्यात आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी अनेक ज्येष्ठांना निवृत्तीवेतन लवकर घ्यावे लागले. काहींना एप्रिलच्या पहिल्या आठवड्याचा वायदा करण्यात आला. त्यात आता नोटाटंचाई उद््भवली आहे. त्यातही ज्या ज्येष्ठांना मोठ्या रकमा बाळगणे जिकीरीचे वाटते त्यांनी पुरेशी रक्कम सोबत ठेवणे सध्या बंद केले होते. लागतील तसे पैसे बँकेतून काढू या भरवशावर असलेल्यांना या टंचाईचा फटका बसला.
किरकोळ विक्रेते हवालदिल
हॉटेल- अन्य खरेदी, पेट्रोलपंपावरील बिले, करभरणा असे व्यवहार आॅनलाइन किंवा कार्डद्वारे करण्याचे प्रमाण वाढले असले तरी भाजी- फळे- फुले विक्रेते, दूध, पेपर, घरकाम करणाऱ्या व्यक्ती, रोजंदारीवर काम करणारे कामगार यांना रोख रक्कम द्यावी लागते. त्यांना रोजच्या खर्चासाठी ती जवळ बाळगावी लागते. अनेक हॉटेल किंवा दुकानांत २५० रूपयांपेक्षा कमी रक्कम कार्डाद्वारे स्वीकारली जात नाही. तसे फलक त्यांनी लावले आहेत. त्यातही आॅनलाइन व्यवहारांवर अकारण अधिक कर भरावा लागत असल्याने ज्यांनी सुरूवातीला हौस म्हणून कॅशलेसचा पर्याय निवडला होता, त्यांनीही आताा त्यापासून माघार घेतली आहे. त्याचा परिणाम रोख रकमेच्या पुरवठ्यावर झाल्याचे मानले जाते.
कॅशलेसवरील करांचा फटका
कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असले तरी त्या व्यवहारांवरील करांचे, रक्कम वळती केल्यावर किंवा एखाद्या खात्यातून दुसऱ्या खात्यात टाकल्यावर, त्या आधारे भरल्या जाणाऱ्या बिलांवरील कर कमी झालेले नाहीत. त्यामुळे अकारण भूर्दंड पडत असल्याने ग्राहक असे व्यवहार करण्यास फारसे उत्सुक नसल्याचे विक्रेत्यांनी, बँकेतील अदिकाऱ्यांनी सांगितले.
मार्चएण्डचा फटका
३१ मार्चला आर्थिक वर्ष संपताना सर्व व्यवहार पूर्ण करण्यासाठी, कर भरण्यासाठी बँकांत रकमांचा भरणा झाला. मात्र त्यानंतर त्याचा वेळेत हिशेब करून बँकांनी ते चलन तेवढ्या वेगाने पुन्हा बाजारात न आणल्याचा हा परिणाम असल्याचे अर्थतज्ज्ञांनी सांगितले. बँकांनी त्यांचे हिशेब पूर्ण करम्यावर भर दिला. पण ग्राहकांचा विचार करून या रकमा लगेचच वापरात न आणल्याचा फटका आता बसू लागल्याचे सांगितले जात आहे.
२००० च्या नोटा गायब
सुरूवातीच्या काळात मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या दोन हजार रूपयांच्या नोटा आता मिळेनासा झाल्या आहेत. या नोटांचा पुरवठा अचानाकपणे घटल्याचे बँकांही मान्य करतात. या नोटा ठराविक काळानंतर वापरातून काढून घेतल्या जाणार होत्या. त्यामुळे त्या बँकेत जमा झाल्यावर पुन्हा चलनात आणल्या जात नसल्याचा दावा केला जातो. त्यामुळे कमी मूल्याच्या नोटांची मागणी वाढली आणि नव्याने नोटाटंचाई निर्माण झाल्याचा दावा केला जातो.
पर्यटनाला फटका
दिवाळी सुटीच्या पर्यटनाला नोटाबंदीची झळ पोचली होती. त्यातून तीन महिन्यांनी कशाबशा सावरलेल्या हॉटेल, खाद्य, हॉस्पिटॅलिटी, वाहतूक, लाइफस्टाइलशी संबंधित व्यवसायांना नव्याने उद््भवलेल्या नोटाटंचाईचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. त्यांना नव्याने या टंचाईची झळ बसेल असे मानले जाते. ज्यांचे पर्यटनाचे नियोजन अद्याप झालेले नाही, अशा अनेकांचे प्लॅन बारगळण्याची भीती व्यावसायिकांना वाटते. आधीच्या सिझनला या टंचाईचा फटका बसला होता. उन्हाळी सुट्टीत त्याची भरपाई होईल, असे वाटत असताना नव्याने नोटाटंचाई झाल्याने त्या व्यावसायिकांच्या पोटात गोळा आला आहे.