Join us  

मुंबई विद्यापीठातर्फे आता ‘ऑन जॉब ट्रेनिंग’; म्युझियम, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीत संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 10:50 AM

कामामुळे प्रत्यक्ष व अनुभवाधारित शिक्षणातून कौशल्यवृद्धी झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागातील विद्यार्थ्यांना कार्यांतर्गत प्रशिक्षणाच्या  (ऑन जॉब ट्रेनिंग) माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (म्युझियम), बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीत काम करण्याची संधी मिळाली आहे. कामामुळे प्रत्यक्ष व अनुभवाधारित शिक्षणातून कौशल्यवृद्धी झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्रातही ऑन जॉब ट्रेनिंग देण्यात आले. यामुळे प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना क्युरेटर, गाइड, संग्रहालय प्रदर्शनाचे आयोजन, कागदपत्रे जतन व संवर्धनाचे तांत्रिक ज्ञान, संग्रहालय व संग्रह व्यवस्थापन, वारसा संवर्धन, अभ्यागत सर्वेक्षण, जर्नल प्रकाशन, ग्रंथालयातील कामे, कंटेन्ट तयार करणे, समाजमाध्यमांसाठी आशय तयार करणे इत्यादी बाबींचे प्रशिक्षण मिळाले.

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना कार्यांतर्गत प्रशिक्षण अनिवार्य आहे. इतिहास विभागाने पुढाकार घेऊन विविध संस्थेत विद्यार्थ्यांना कार्यांतर्गत प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. पुढेही अनेक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंगसाठी पाठविले जाणार आहे. - प्रा. संदेश वाघ, इतिहास विभागप्रमुख, मुंबई विद्यापीठ

विद्यार्थ्यांचे अनुभव कथन-

म्युझियमच्या समाजमाध्यम विभागासाठी काम करणाऱ्या प्रचेता हजारिका हिला समाजमाध्यमांचे तंत्रज्ञान, विपणन व्यवस्थेचे कौशल्य, आशय अशा विषयाच्या अनुभवाधारित शिक्षण मिळाले. अल्फाबेटिकल कॅटलॉग, डिजिटल कॅटलॉग, क्लासिफिकेशन, रजिस्टर्ड डिटेल्स असे विषय शिकायला मिळाल्याचे सोनिया गुप्ता हिने सांगितले. संग्रहालय प्रदर्शनी आयोजन, प्रकाश, रंगव्यवस्थेचे परिणाम अनुभवायला मिळाल्याचे कृष्णा जवेरी या विद्यार्थ्याने सांगितले. 

अभ्यागत सर्वेक्षणांतर्गत पर्यटक, विद्यार्थी, सर्वसामान्यांकडून माहितीचे संकलन करून अहवाल तयार करण्याचा अनुभव निश्चय सुर्वे यांनी कथन केला. आर्टिफेक्ट्स, स्कल्प्चर्स, गॅलरींना भेट देणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांसोबत साधलेला संवाद हा समृद्ध करणारा असल्याचे शॅनन फर्नांडिसने सांगितले. 

टॅग्स :मुंबईमुंबई विद्यापीठविद्यार्थीनोकरी