मनोज मोघेलोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अन्नधान्य, दूध, मिठाई यासारख्या पदार्थांत मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असते. विशेषतः सणासुदीच्या काळात होणारी ही भेसळ अन्न व औषध प्रशासनाकडून होणाऱ्या कारवाईनंतरही पूर्णतः रोखणे शक्य झालेले नाही. अशा भेसळखोरांवर कारवाई करण्यासाठी सरकारने कडक पावले उचलली आहेत. भेसळ झालेल्या ठिकाणी पोहोचून जागेवरच 'दूध का दूध, पानी का पानी' करण्यासाठी सरकार १८ मोबाइल प्रयोगशाळा खरेदी करीत आहे. भेसळीचा सुगावा लागताच ही मोबाइल प्रयोगशाळा त्या ठिकाणी पोहोचून भेसळखोरांचे पितळ उघडे पाडणार आहेत.
बाजाराच्या ठिकाणी उभी राहणार व्हॅनदोन जिल्ह्यांसाठी एक व्हॅन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या व्हॅनमध्ये २ अन्न सुरक्षा अधिकारी, २ सहायक यांची टीम कार्यरत असणार आहेत. बाजाराच्या ठिकाणी या व्हॅन उभ्या करण्यात येणार भेसळ असून व्हॅनला बसविण्यात आलेल्या एलसीडीच्या माध्यमातून जनजागृतीही केली जाणार आहे. अन्न सुरक्षा नियम व भेसळ कशी ओळखावी याची माहिती बाजारात येणाऱ्या लोकांना मिळणार आहे.प्रयोगशाळेत होणार या तपासण्या दुधातील भेसळ, चहा पावडरमधील रंगांची भेसळ, चटणीसदृश मसाले पदार्थात होणारी रंगांची, मध, साखरेतील भेसळ, अन्नपदार्थाची गुणवत्ता तपासणी, फळांची गुणवत्ता तपासणी या प्रयोगशाळेद्वारे केली जाणार आहे.
भेसळ तापसणीसाठीच्या या मोबाइल प्रयोगशाळा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. तक्रार येताच या प्रयोगशाळा त्या ठिकाणी पोहोचून अन्न पदार्थाची तपासणी करून तत्काळ अहवाल देणार आहेत. यापूर्वी भेसळीचा अहवाल येण्यास तीन महिने लागत होते. मात्र, आता या प्रयोगशाळांतून तत्काळ मिळणाऱ्या अहवालामुळे संबंधित व्यापाऱ्यांवर जागेवरच कारवाईचा बडगा उगारणे शक्य होणार आहे. या व्हॅनच्य खरेदीसाठी १६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती अन्न औषध प्रशासन विभागाचे मंत्री संजय राठोड यांनी दिली.