‘आता एक दिवस असा येईल की भाजपा गॅस सिलेंडर फुकटात देईल, कारण…’ उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 04:46 PM2023-08-30T16:46:43+5:302023-08-30T16:47:45+5:30
Uddhav Thackeray Criticize BJP: इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी आज महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली.
मुंबईमध्ये ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक होत आहे. या बैठकीपूर्वी आज महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. केंद्रातील मोदी सरकार गॅसवर आहे. त्यामुळे आता एक दिवस असा येईल की, भाजपा गॅस सिलेंडर फुटताही देईल, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकीपूर्वी दबावामुळे भाजपाने गॅस सिलेंडर दोनशे रुपयांनी स्वस्त केला आहे. आता एक दिवस असा येईल, की भाजपा सरकार गॅस फ्रीमध्ये देईल. कारण आता भाजपा सरकारच गॅसवर आहे. गॅस स्वस्त करून रक्षाबंधनाची भेट दिली असं भाजपा नेते म्हणताहेत. मग गेली ९ वर्षे रक्षाबंधन नव्हतं का, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी विचारला.
यावेळी महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरूनही उद्धव ठाकरे यांनी भाजपावर घणाघाती टीका केली. यावर्षी भाजपाने आपल्या नेत्यांना मुस्लिम महिलांकडून रक्षाबंधन करून घेण्यास सांगितले होते. मात्र राखी बांधून घ्यायची असेल तर ती बिल्किस बानोकडून बांधून घ्या. मणिपूरमध्ये अत्याचार झालेल्या त्या दोन महिलांकडून बांधून घ्या, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी भाजपाला लगावला.
विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे देशातील संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे.