मुंबई : मालाड, मालवणी, चेंबूर, गोवंडीसह मुंबईतल्या कोणत्याही भागात नळ घ्यायचा असेल तर आजही नागरिकांना मुंबई महापालिकेचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.दुर्दैव म्हणजे पाच घरांच्या नळजोडणीसाठी महापालिकेला अदा करावे लागणाऱ्या ५०० रुपयांसोबत पाइप आणि इतर खर्च पकडून १० हजार रुपये खर्च होणे अपेक्षित आहे. मात्र सुरू असलेल्या गैरप्रकारांमुळे पाच घरांसाठीच्या एका नळजोडणीला नागरिकांना तब्बल ३५ हजार रुपये द्यावे लागत आहेत. दरम्यान, मुंबई महापालिकेने यासाठी सरकारी प्लंबर नेमला आणि त्याने नळजोडणीच्या ठिकाणाचा सर्व्हे करत जोडणी दिली तर साहजिकच हा खर्च ३५ हजारांहून १० हजार रुपयांवर येऊन ठेपले, अशी माहिती सूत्रांनी दिली.मुंबईतल्या वस्तीमध्ये कंत्राटदार जातात. नळजोडणी हवी असेल तर कंत्राटदाराकडून पैसे आकारले जातात. पाच घरांसाठी नळजोडणी घेतली तर परवानाधारक कंत्राटदाराला ३५ हजार रुपये द्यावे लागतात. यातच महापालिका आणि परवानाधारक कंत्राटदाराच्या रकमेचा समावेश असतो. यातील १० हजार रुपये ही रक्कम सरकारी खर्च म्हणून पकडली तर यात अंदाजे ५०० रुपये हे चलान असते.उर्वरित खर्च पाइपलाइनचा असतो. हा सगळा खर्च १० हजारांच्या आसपास असतो. यातच मीटरचा खर्च असतो. हा खर्च पाच घरे वाटून घेतात. आता ३५ हजारांतले उरले २५ हजार रुपये; हे पैसे कुठे जातात? याचे उत्तर कोणीच देत नाही. नळजोडणीसाठी अत्यंत कमी खर्च असताना ३५ हजार का आकारले जातात. गरिबांकडून एवढे पैसे का आकारले जातात.प्रत्येकाला पाणी देण्यासाठी सरकारी प्लंबर का नाही?गरीबांना पाणी द्यायचे, केवळ गरीबच नाही तर प्रत्येकाला पाणी देण्यासाठी सरकारी प्लंबर का नाही. सरकारी प्लंबर असेल तर जेथे नळजोडणी आवश्यक आहे; तेथे तो दाखल होईल. सर्व्हे करेल आणि याद्वारे १० हजारांत काम होईल. म्हणजे १० हजारांत नळजोडणी होईल. दरम्यान, याबाबत परवानाधारक प्लंबर सरकारी असावा तो खासगी का आहे? याची उत्तरे महापालिका देत नाही, असे घर बचाओ घर बनाओ आंदोलनाचे बिलाल खान यांनी सांगितले.
आता सरकारी प्लंबरच मिटवेल मुंबईकरांची तहान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2020 1:48 AM